स्थलांतर प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: July 5, 2015 01:17 IST2015-07-05T01:16:25+5:302015-07-05T01:17:47+5:30
चिपळूण तालुका : गोवळकोट कदम बौध्दवाडीला दरडीचा धोका

स्थलांतर प्रश्न ऐरणीवर
चिपळूण : शहरातील गोविंदगड या ऐतिहासिक किल्ला परिसरात भेगा पडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूवैज्ञानिकांकडून या भागाची पाहणी करण्यात आली आहे. गोवळकोट कदम बौध्दवाडी येथील घरांनाही दरडीचा धोका आहे. येथील रहिवाशांचा स्थलांतराचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याबाबत जलदगतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गेल्या महिन्यात गोविंदगड येथील ऐतिहासिक किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने शासन यंत्रणा जागी झाली आहे. या परिसरातील भेगांमध्ये वाढ होत आहे का? यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशसानातर्फे कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तारा बौध्दवाडी, भोईवाडी आदींसह किल्ला परिसरातील तीन वाड्यांना धोका संभवत असल्याने शासनातर्फे १५३ कुटुंबियांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. धोकादायक स्थितीत ग्रामस्थांना निवारा मिळण्यासाठी समाज मंदिर येथे अडीच लाखांची शेड उभारण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने नियोजन केले असून याबाबतचे आदेशही संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत.
या परिसरातील कदम बौध्दवाडीला दरडीचा धोका असून याबाबत गेल्या २५ वर्षापूर्वी स्थलांतराबाबत उपाययोजना करण्याचे ठरले होते. मात्र याबाबतचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला असून गोविंदगड परिसरात भेगा पडल्या असल्याने स्थलांतराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या परिसरातील १५ कुटुंबियांचे स्थलांतर करावे लागणार आहे. स्थलांतराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने येथील रहिवाशी भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत.
या परिसरात सरकारी जागा असून स्थलांतराबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. येथील रहिवाशांनी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांची भेट घेवून चर्चा केली. संरक्षक भिंतीचा प्रस्तावही मंजूर झाला असून यासाठी अंदाजे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने शासकीय निधीतून ही रक्कम मिळाल्यास संरक्षक भिंतीचा प्रश्नही मार्गी लागेल यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)