सीमोल्लंघन सोहळा थाटात
By Admin | Updated: October 5, 2014 23:09 IST2014-10-05T21:41:01+5:302014-10-05T23:09:23+5:30
ऐतिहासिक वारसा : साळशी गावात शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती

सीमोल्लंघन सोहळा थाटात
शिरगांव : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी गावच्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर-पावणाई मंदिरात विजयादशमी व सीमोल्लंघनाचा सोहळा शनिवारी शाही थाटामाटात पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आला.
नवरात्रोत्सवाची सांगता लळीत कार्यक्रमाने झाल्यानंतर विजयादशमी दिवशी पहाटे ५ वाजता ब्राह्मण विधीप्रमाणे पायघडीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मखरातील उत्सवमूर्ती गाभाऱ्यात ठेवल्या जातात. त्यानंतर काकड आरती होते. साळशी गावचे शिरगांव, किंजवडे व आयनल या शिवधड्यांचा मानापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर देवीसमोर ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात होते. दुपारी ३.३० वाजल्यानंतर इनामदार श्री देवी पावणाई मंदिरात इशारत करून गावातील ग्रामस्थांना जमा केले जाते. त्यानंतर शिवकळा काढून शिवकळेकडून हुकूम झाल्यानंतर ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, तरंग (देव), मशाल, अबदागीर, निशाण, घडशी, गोंधळी, भालदार, चोपदार अशा संपूर्ण साजासह शेकडो ग्रामस्थ व भाविकांसह सीमोल्लंघनासाठी निघतात.
इनामदार श्री देव सिद्धेश्वर-पावणाई मंदिरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर आपट्याचे ठिकाण येथे सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. याठिकाणी आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पूजा केली जाते. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. आपट्याच्या ठिकाणाहून परतीस येताना ८४ च्या चाळ्याला देणे देऊन त्याठिकाणी शिवकळा शेव घालतात. त्यानंतर गांगो, विठ्ठलादेवीला भेट देण्याचा रिवाज आहे. त्यानंतर इनामदार श्री देव सिद्धेश्वर आकार देवालयाभोवती फेरी मारून झाल्यानंतर इनामदार श्री देवी पावणाई देवालयाभोवती व श्री देव रवळनाथ मंदिरास फेरी मारून इनामदार श्री देवी पावणाई मंदिरात देवीच्या पाषाणांची भेट घेतल्यानंतर देवता पापडीवर याठिकाणी जातात. येथे ग्रामस्थ देवतांना सोने देऊन कृपाशिर्वाद घेतात.
यावेळी हरदास, किर्तनकार, घडशी, गोंधळी, भालदार, चोपदार यांच्या रखवालीबद्दल शिवकळेकडून वचन घेतले जाते. त्यानंतर पुन्हा मांडावर आणून शिवकळा स्थिर केल्या जातात.
यानंतर पाहुणे मंडळी, ग्रामस्थ इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई यांच्या मंदिरात जावून दर्शन घेऊन देवतांना सोने अर्पण करतात. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई या दोन्ही देवतांच्या पाषाणांकडे ब्राह्मणाकरवी अभिषेक करून शिवकळा काढली जाते. तीन महाल (सालस, पाटण, कुडाल) व ८४ खेड्यातील भाविकांची विनंती ठेवून प्रश्न सोडविले जातात. आलेल्या मंडळींची कामे पूर्ण होईपर्यंत हा कार्यक्रम चालतो. (प्रतिनिधी)
शाही सोहळा
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावच्या विजयादशमी व सीमोल्लंघनाचा शाही सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी दूरदूरुन शेकडो भाविक येथे येतात. एकंदरीतच डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यात भक्तीमय वातावरणात मंदिराचा परिसर न्हाऊन जातो.