शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण
By Admin | Updated: July 28, 2015 20:43 IST2015-07-28T20:43:47+5:302015-07-28T20:43:47+5:30
भाई चव्हाण : प्राथमिक शिक्षक समितीच्या सभेत वादळी चर्चा

शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण
सिंधुदुर्गनगरी : शालेय कामातील त्रुटींबाबत बाजू मांडण्याची संधी न देता प्रशासनामार्फत उर्मट भाषेत दरडावले जाते. केवळ शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ही कार्यपद्धती अवलंबिली जाते, याबद्दल नाराजी व्यक्त करून पदाधिकाऱ्यांच्या या कार्यपद्धतीचा समाचार शिक्षक नेते भाई चव्हाण व राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी घेतला. प्राथमिक शिक्षक समितीच्या ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात झालेल्या सभेत वेगवेगळ्या तालुक्यात लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शाळांना आकस्मिक भेटी देऊन शिक्षकांना अवमानित केले याची चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी खच्चीकरण करण्याच्या या पद्धतीत जर बदल झाला नाहीतर शिक्षक समितीला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला. शैक्षणिक गुणवत्तेबाबत काळजी करताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शाळांचे जे प्रश्न निर्माण झालेत ते सोडविण्यासाठी का प्रयत्न होत नाहीत? विविध अशैक्षणिक कामांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला हे स्वत: शालेय शिक्षण प्रधान सचिव यांनी मान्य केले आहे.
शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षकांची सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरून व माध्यमिक शिक्षकांप्रमाणे शाळेतील १०० टक्के वेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देऊन नंतरच गुणवत्तेचा डंका मिरवावा.
शिक्षकांच्या शालेय कामकाजात त्रुटी असतील, तर त्याला लेखी पत्र देऊन खुलासा घ्यावा. परंतु, विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाला अवमानित करण्याच्या कार्यपद्धतीला समितीचा विरोध राहील, असेही भाई चव्हाण व चंद्रकांत अणावकर यांनी इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण विभाग प्रशासनाच्या अक्षम्य चुकांमुळे शाळांना सादील अनुदान मिळत नाही. शैक्षणिक साहित्य, वाहतूक भत्ता दिला जात नाही. शालार्थ व सरल संगणकीय प्रणालीसाठीच्या सोयी सुविधा शाळांना पुरविल्या जात नाहीत.
आर.टी.ई. अधिनियमात तरतूद असताना शिक्षकांच्या दीर्घ मुदत रजा काळात स्वयंसेवक नेमले जात नाहीत. शाळांना आवश्यक स्टेशनरी पुरविली जात नाही. या व अशा अनेक समस्यांबद्दल लोकप्रतिनिधी सभांतून अवाक्षर न काढता प्रशासनाला पाठीशी घालतात.