वैद्यकीय अधिकारीच पैसे मागतात
By Admin | Updated: July 5, 2014 00:08 IST2014-07-04T23:01:53+5:302014-07-05T00:08:02+5:30
संतोष किंजवडेकर यांचा आरोप : देवगड पंचायत समिती मासिक सभा

वैद्यकीय अधिकारीच पैसे मागतात
देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारीच रूग्णांकडे पैशांची थेट मागणी करीत असल्याचा घणाघाती आरोप संतोष किंजवडेकर यांनी केला. या विषयासह अन्य विषयांवर येथील पंचायत समितीची किसान भवन सभागृहात झालेली शुक्रवारी सकाळची मासिक सभा लक्षणीय ठरली.
यावेळी सभापती सदानंद देसाई, उपसभापती अनघा राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. कुणकेश्वर शाळेमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांच्या खासदार निधीतून तीन वर्गखोल्यांचे बांधकाम झाले. परंतु हे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थ मंडळासह संचालक मंडळाकडून उपस्थित करण्यात आली. त्यामध्ये गंभीर चौकशी व्हावी, अशी मागणी माजी सभापती वसंत सरवणकर यांनी केली. यानंतर या कामाचे क्वॉलिटी कंट्रोल आॅडीट व्हावे, अशी मागणी करणारा ठराव सभेने मंजूर केला. याचबरोबर आपण स्वत: लक्ष घालून धालवली ग्रामपंचायतीसाठी पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या जनसुविधा केंद्राचा निधी केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व संबंधित राजकीय व्यक्तींकडून झालेल्या हस्तक्षेपामुळे परत गेल्याची बाब सरवणकर यांनी उपस्थित केली. सुमारे १० लाखांच्या निधीला धालवली ग्रामपंचायत मुकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या व्यतिरिक्त आणखी ३० लाखांचा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठीचा निधी तरी योग्यप्रकारे वापरला जावा व त्यात अडचणी येऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मालमत्तेवर अनधिकृत अतिक्रमण होत आहे का? याची चौकशी करण्यासाठी मागणी करणारा मुद्दा माजी उपसभापती रवींद्र जोगल यांनी उपस्थित केला. त्यावर चर्चा होऊन सर्व संबंधित खात्यांच्या अखत्यारीतील मालमत्तेची यादी सादर करण्याची आदेश गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात होणाऱ्या गैरप्रकारांची, विशेषत: रूग्णांकडून थेट पैशांची मागणी करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या प्रकारांची चौकशी करावी अशा अर्थाचे पत्र आपण स्वत: त्यांना लिहू असे खुलासावजा आश्वासन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी संतोष किंजवडेकर व सभागृहातही दिले. या प्रश्नावर वसंत सरवणकर, संतोष किंजवडेकर यांच्यासह रवींद्र जोगल यांनीही चर्चेत भाग घेतला.
शालेय पोषण आहारापासून तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थी वंचित राहिले होते, परंतु काही दिवसातच याबाबतच्या निधीची तरतूद होऊन जिल्हा परिषदेमार्फत हा निधी पुरवठा विभागाला पुरवला जाईल व धान्य पुरवठा होईल, याची खात्री पंचायत समिती सदस्या दिप्ती घाडी यांना गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. देवगड तालुक्यात १३व्या वित्त आयोगांतर्गत २३५ कामे प्रस्तावित होती, त्यातील २१४ पूर्ण झाली व अन्य २१ कामे व त्यांचे प्रस्ताव आराखडा मंजुरी व प्रशासकीय निविदा प्रक्रियेसाठी पुढे गेली असल्याची माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सभागृहाला दिली.
तांबळडेगसह अन्य धूपप्रतिबंधक कामांमध्ये भ्रष्टाचार होत असून सिमेंट, वाळू, खडी यांची अनधिकृत विक्री ठेकेदारामार्फत होत आहे. याची गंभीर दखल घेण्याची मागणी तांबळडेग पंचायत समिती सदस्य डॉ. वारंग यांनी केली. यावर पत्तनचे वरिष्ठ अधिकारी, पंचायत समिती सदस्य व प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्याचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मान्य केले. (प्रतिनिधी)