स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी यंत्रणा सतर्क
By Admin | Updated: March 3, 2015 00:31 IST2015-03-02T23:10:46+5:302015-03-03T00:31:54+5:30
ई. रवींद्रन : लोकशाही दिनात ६ तक्रार अर्ज प्राप्त असल्याची माहिती

स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी यंत्रणा सतर्क
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात स्वाईन फ्ल्यूवर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. आवश्यक औषधे व ६ हजार ५०० गोळ््या उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून स्वाईन फ्ल्यूबाबत दक्ष राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, निवासी पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे आदी उपस्थित होते.
राज्यभरात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने थैमान घातले आहे. यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण सापडला नसला तरी आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्ल्यूबाबत तत्काळ दक्षता घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर आवश्यक औषधांसह ६ हजार ५०० गोळ््या उपलब्ध ठेवण्यात आल्या असून आरोग्य यंत्रणेला स्वाईन फ्ल्यूबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ई. रविंद्रन यांनी दिली.
पावशी येथील सागर तुळसुलकर यांच्या तक्रार अर्जाबाबत, संबंधित कुडाळ तहसीलदारांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.
लोकशाही दिनात ६ तक्रार अर्ज
आजच्या लोकशाही दिनात एकूण ६ तक्रार अर्ज प्राप्त झाले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय- १, पोलीस अधीक्षक- १, वीज वितरण कंपनी- २, कृषी विभाग- १, सावंतवाडी नगरपालिका- १ अशा सहा तक्रार अर्जांचा समावेश आहे. प्राप्त तक्रार अर्ज संबंधित कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी
दिली.(प्रतिनिधी)