कोकण रेल्वेसाठी झुकते माप?
By Admin | Updated: November 10, 2014 23:54 IST2014-11-10T23:27:05+5:302014-11-10T23:54:06+5:30
प्रश्न मार्गी लागणार? : सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्रिपदामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवीत

कोकण रेल्वेसाठी झुकते माप?
राजापूर : केंद्रीयमंत्री मंडळात समावेश झाल्यानंतर रेल्वेसारखे महत्त्वपूर्ण मंत्रिपद लाभलेल्या सुरेश प्रभूंमुळे कोकण रेल्वेला चांगले दिवस प्राप्त होतील. शिवाय प्रलंबित सौंदळ रेल्वे स्थानकालादेखील चालना मिळेल, अशी आशा कोकणवासीयांना लागून राहिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात माजी मंत्री सुरेश प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेटमंत्री म्हणून नियुक्ती झालेल्या प्रभूंकडे रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुपूर्द केला आहे. या निवडीमुळे मागील अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला रेल्वे खाते लाभले आहे. यापूर्वी १९७७ च्या जनता लाटेत व तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळचे राजापूरचे खासदार प्रा. मधु दंडवते हे रेल्वेमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रातून प्रदीर्घ काळानंतर रेल्वेमंत्री म्हणून काम करण्याची संधी सुरेश प्रभू यांना लाभली आहे.प्रा. दंडवते त्यांच्या कारकिर्दीत कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी चालना देताना वाटचाल सुरु केली होती. त्यानंतर १९८८च्या विश्वनाथ प्रतापसिंह मंत्रिमंडळात दंडवते हे अर्थमंत्री, तर ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झाली. कालांतराने कोकणात रेल्वे आणण्याचे स्वप्न सत्यात उतरले होते. त्यानंतर मागील दीड दशकाच्या कालखंडात कोकण रेल्वेच्या समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्यात अधकिच भर पडत गेली. दुर्दैवाने त्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे वरच्यावर रेल्वेला अपघात होऊन जीवितहानी व वित्तहानीसारखे प्रकार वाढत आहेत. रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्न कायम आहे. या समस्या मागील अनेक वर्षांपासूनच्या राहिल्या आहेत.
राजापूरसारख्या दुर्गम तालुक्यासाठी सातत्याने मागणी हात असलेल्या सौंदळ स्थानकाचा प्रश्न अधांतरी आहे. त्यामुळे बहुसंख्य तालुकावासीयांना रेल्वेचा प्रवास समाधानकारकपणे करता येत नाही. यापूर्वीच्या रेल्वे अर्थसंकल्पात सुतोवाच केलेल्या कोल्हापूर-राजापूर या नियोजित रेल्वे मार्गाबाबत अजूनही निश्चिती झालेली नाही. इथल्या शेतकरी बांधवांनी आपल्या बहुमूल्य जमिनी देऊनदेखील कोकणला रेल्वेकडून आजवर न्याय मिळालेला नाही. त्यामुळे रेल्वेसारखे मोठे वजनदार खाते सुरेश प्रभूंकडे आल्याने कोकण रेल्वेच्या समस्या आता मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
यापूर्वी शिवसेनेकडून केंद्रात उद्योग, खत, रसायन, वन पर्यावरण, ऊर्जा खात्याचे मंत्री व नद्या जोड प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून सुरेश प्रभूंनी आपली जबाबदारी बजावली होती. आता रेल्वे खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असून, देशातील सर्व विभागातील रेल्वेसह कोकण रेल्वेला ते न्याय देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)