विरोध चिरडण्यासाठी नगराध्यक्षांचा ‘फासा’?

By Admin | Updated: July 19, 2015 23:34 IST2015-07-19T23:30:26+5:302015-07-19T23:34:50+5:30

रत्नागिरी पालिका : अतिक्रमण विषयावरुन होणार विरोधकांची घुसमट!

Mayor's 'clash' to counter opposition? | विरोध चिरडण्यासाठी नगराध्यक्षांचा ‘फासा’?

विरोध चिरडण्यासाठी नगराध्यक्षांचा ‘फासा’?

रत्नागिरी : राजकीय चमत्कार घडविण्यात माहीर असलेले रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपल्या विरोधकांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी नवा ‘फासा’ टाकला आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेली मोठ्या संख्येतील अतिक्रमणे हटवण्याचा सोमवारपासून होणारा प्रारंभ हा याच डावपेचांचा भाग आहे. त्यात काही राजकीय नेत्यांच्या अतिक्रमणांचाही समावेश असल्याने विरोधकांची घुसमट करण्यासाठीच ही कारवाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रत्नागिरी नगर परिषदेत सध्या राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजपमधील संबंध टोकाला गेले असल्याने सध्या रत्नागिरी पालिकेतील राजकारण केंद्रीत बनले आहे. अत्यंत नाट्यमय पध्दतीने भाजपातील स्वत:सह सहा नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करून महेंद्र मयेकर यांनी भाजपकडून आधी मिळणार नसलेले नगराध्यक्षपद हिसकावले. सहा जणांचा वेगळा गट झाल्याने भाजपकडे केवळ २ नगरसेवक उरले. त्यामुळे सत्ता तर हाती राहील, या उद्देशाने महेंद्र मयेकर यांना भाजपचेच नगराध्यक्ष म्हणून भाजप नेत्यांना जाहीर करावे लागले होते. त्यांच्या या नगराध्यक्षपदाला २४ जुलै २०१५ रोजी सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे.
सत्तेवर आलेल्या तत्कालिन युतीचा पाच वर्षांचा कालावधी संपायला अजून, सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. सध्या मात्र पालिकेत युती नाही. त्यामुळे पदाचा राजन्ीाामा देण्याचा प्रश्न येत नाही, असे नगराध्यक्षांनीच सांगितले आहे. त्यामुळे पुढील सव्वा वर्षासाठी सेनेला नगराध्यक्षपद मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची राजकीय कोंडी करण्याची व्यूहरचना त्यांच्या पालिकेतील विरोधकांनी आखली आहे. त्यात मयेकर यांना अडकवण्याचे प्रयत्न जोरात आहेत. त्यामुळे आपली कोंडी होण्याआधी विरोधकांचीच कोंडी करण्याचा फासा नगराध्यक्षांनी फेकला असल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते दांडा फिशरीजपर्यंतच्या मुख्य मार्गाच्या दुतर्फा रस्ता व गटाराच्या जागेत व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामध्ये फिरत्या हातगाड्या म्हणून परवाना मिळविणारे ८० पेक्षा अधिक विक्रेते रस्त्याच्या कडेला गटारावर एकाच ठिकाणी आपली दुकाने थाटून आहेत.
त्यांना काही लाभार्थी राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे. राजकीय स्वार्थापोटी काहींनी या व्यवसायाच्या आडून आपली दुकाने सुरू केली आहेत. पालिकेपेक्षा मधल्या एजंट्सना अधिक कर द्यावा लागत आहे. काही पुढाऱ्यांसाठी ही बलस्थाने आहेत. नेमकी हीच बलस्थाने मोडून काढण्यासाठी नगराध्यक्ष मयेकर सरसावले आहेत.
याशिवाय मुख्य रस्त्यालगतच्या काही दुकानदारांनी आपल्या दुकानांची छपरे गटारांवर व्यापली आहेत. गटारांवरही काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यामुळे गटारांच्या या जागा मोकळ्या करण्यासाठी अशा गटारांना व्यापलेल्या छपरांवरही हातोडा फिरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अतिक्रमण हटवण्याची ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात होणार आहे. त्यामुळे कारवाईच्या वेळी कोणाला ब्र ही काढता येणार नाही, अशी योजना आखण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


नोटीसची गरजच नाही...
अतिक्रमणवाल्यांना समज
पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चार दिवसांपूर्वीच अतिक्रमणे, गाड्या हटवण्याची समज देण्यात आली आहे. त्यांना नोटीस बजावली काय, असे विचारता पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. तरीही संबंधितांना समज देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
गॉडफादर होणार उघड
मुख्य मार्गावरील अतिक्रमणे हटवताना ती वाचवण्यासाठी काहीजण प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर या अतिक्रमणांमागे असलेले ‘गॉड फादर’ आपोआपच उघड होणार असल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Mayor's 'clash' to counter opposition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.