रत्नागिरीत विजयाचे गणित अवघड
By Admin | Updated: October 6, 2014 22:38 IST2014-10-06T21:26:36+5:302014-10-06T22:38:28+5:30
पायाखालची सरकली वाळू : मतांचे ‘वेट’ कोणाच्या पदरात पडणार, याबाबत अनिश्चितताच

रत्नागिरीत विजयाचे गणित अवघड
प्रकाश वराडकर --रत्नागिरी --विधानसभा मतदारसंघात मुख्य निवडणूक दुरंगीच होणार असल्याचे सुरुवातीचे चित्र आता ‘चौरंगी’ बनले आहे. या मतदारसंघात प्रमुख पक्षांचे चार उमेदवार रिंगणात आहेत. चौघांनीही मतदारांना आपल्याकडेच खेचण्यासाठी ‘नेट’ लावल्याने मतांचे ‘वेट’ कोणाच्या पदरात पडणार, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. विजयाचे गणित अवघड बनले आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये राष्ट्रवादीतून निवडून आलेले व वर्षभर मंत्री म्हणून काम केलेले उदय सामंत शिवसेनेत प्रवेश करून तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत, तर त्यांच्याच विरोधात दोन वेळा पराभूत झालेले भाजपाचे सुरेंद्र तथा बाळ माने हेसुध्दा तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उदय सामंत यांचे पारडे जड होते, तर त्यांना तूल्यबळ म्हणून भाजपाचे बाळ माने यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलले असून चौरंगी बनले आहे.
गद्दारांना धडा शिकवा, अशी हाळी देत राष्ट्रवादीने येथून मुस्लिम समाजाचे नेते बशीर मुर्तुझा यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या बाजूने फारसा जोर दिसत नव्हता. मात्र, आता राष्ट्रवादीनेही सेनेत गेलेल्या सामंत यांची राजकीय कोंडी करण्यासाठी ‘डावपेच’ आखले आहेत. मतदारसंघातील राष्ट्रवादीची पडझड थोपवून मुर्तुझा यांना पक्षाची ७० ते ७५ टक्के मते मिळविण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडूनही त्यांना डावपेचांचे मार्गदर्शन होत आहे.
कॉँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनीही आपली मते वाढविण्याचे नियोजनबध्द प्रयत्न सुरू केल्याने त्याचा फटका कोणाला, बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघातील पक्षाची परंपरागत मते अन्यत्र जाऊ नयेत, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या भंडारी समाजातर्फे तालुका भंडारी समाज संघानेही भंडारी समाजाचा व बहुजन समाजातील उमेदवार कॉँग्रेस पक्षाने दिल्याने पत्रकारपरिषद घेऊन कीर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बहुजन समाजानेही कीर यांना मतदान करून बहुजन समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले आहे. त्याचा परिणाम किती होतो, यावरही मतांचे गणित अवलंबून राहणार आहे.
भाजपाचे बाळ माने यांच्या प्रचारासाठी संघाचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. त्यांच्या मिऱ्या गावात ग्रामस्थांनी पूर्णत: बाळ माने यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने तेथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचीही पंचाईत झाली आहे. ५ हजार कामगार असलेली व बंद पडलेली भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करण्याचे वचन माने यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या बळावर दिले असून, गडकरींनीही तसा शब्द दिला आहे. त्यामुळे या कंपनीचे बेरोजगार कामगार व त्यांचे परिवार मानेंच्या बाजूने राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील नाराजीला फुंकर घालत भाजपाला लाभ करून घेण्याचाही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सर्व स्थितीचा सामना करण्यास शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत हे सज्ज झाले असून, तालुक्यात शिवसेना बळकट असल्याचा पुरेपूर उपयोग कसा करावा, यासाठीची रणनीती त्यांनी आखून त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. नेत्यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले असले तरी कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवणे त्यांच्यासाठी काहीसे कठीण जात असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे. या संपूर्ण स्थितीत मतांची विभागणी चार पक्षांमध्ये होणार हे अटळ आहे. त्यातच अपक्ष व अन्य काही पक्षांचे उमेदवार हजारो मते खाणार हे निश्चित आहे. यामुळेच निवडून नक्की कोण येणार, याबाबत अनिश्चितता असून, सर्वच पक्षात अस्वस्थतेचे वातावरण आहे.
गोबेल्स नीतीचा वापर!
प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपलाच उमेदवार जिंकणार असा दावा करीत आहेत. तर काहीजणांकडून ‘खोटे बोला पण ठासून बोला’, याप्रमाणे गोबेल्स नीतीचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे मतदारराजा गोबेल्स नीतीला भाळणार की, योग्य उमेदवार निवडीची आपली नीती वापरणार, यावर विजयाचे गणित सुटणार आहे.
कार्यकर्ते असूनही....!
कार्यकर्ते असूनही प्रचाराला कोणी नाही, अशी स्थिती काही उमेदवारांबाबत निर्माण झाली असून, त्यांना खाडीपट्टा येथून व मुंबईतून प्रचारासाठी कार्यकर्ते बोलावण्याची वेळ आल्याचीही चर्चा सुरू आहे. मुंबईतील कार्यकर्तेही येत्या चार दिवसांत प्रचारासाठी रत्नागिरीत दाखल होणार असल्याचा बोलबाला आहे.