सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या या आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, देऊळवाडी आणि घोगळवाडी येथील तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.गुरूवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसले. आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुण तत्काळ सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर धावले. त्यांनी बँकेचा लाकडी दरवाजा तोडून आग आटोक्यात आणण्यासाठी लगबगीने आत प्रवेश केला. आगीचा वनवा मोठा होता. आग आटोक्यात आणण्यासाठी सेंट्रल बँकेच्या लगत घर असलेल्या दादा घाडी यांच्या मोटारपंपाचा वापर करण्यात आला. तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे तासाभरातच आग आटोक्यात आली. या तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्काळ केलेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला.अन्यथा सेंट्रल बँकेच्या तळमजल्यावर फर्निचरचे कार्यालय आणि बाजूला एटीएम मशीन असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. आग लागल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते आप्पा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, चंद्रशेखर प्रभू, अक्षय पेडणेकर, जयेश तुळसकर, नितीन मांजरेकर, यतीन घाडी, सोनेश सातार्डेकर, संदेश सातार्डेकर, आत्माराम घाडी आणि प्रथमेश पेडणेकर यांनी पुढे सरसावत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
Sindhudurg: सातार्डा येथील सेंट्रल बँकेला भीषण आग, जुनी कागदपत्रे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:33 IST