शहीद जवान गावडे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:23 IST2016-05-24T22:56:20+5:302016-05-25T00:23:56+5:30
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार : आंबोलीत हजारोंच्या जनसमुदायाचा साश्रूनयनांनी निरोप

शहीद जवान गावडे अनंतात विलीन
महादेव भिसे -आंबोली --जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर मंगळवारी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवानाला शेवटचे डोळे भरून पाहता यावे, यासाठी बेळगाव-कोल्हापूर येथून हजारो संख्येने आंबोलीत दाखल झालेल्या नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी ‘वीर जवान पांडुरंग गावडे अमर रहे’, ‘जब तक सुरज चाँद रहेगा, तब तक पांडुरंग गावडे तेरा नाम रहेगा,’ अशा घोषणांनी आसमंतही भावविव्हल झाला होता.श्रीनगर-कुपवाडातील चकड्रगमुल्ला या गावी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आंबोली-मुळवंदवाडी येथील जवान पांडुरंग महादेव गावडे यांना शनिवारी वीरमरण आले होते. पांडुरंग गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता गोव्यातून आंबोलीकडे आणण्यात आले. आंबोली दूरक्षेत्राजवळ बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांनी शहीद गावडे यांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला. त्यानंतर लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून
आंबोली दूरक्षेत्रापासून गावडे यांच्या घरापर्यंत चार किलोमीटर अंत्ययात्रा काढण्यात आली.
या अंत्ययात्रेत पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंह, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती प्रमोद सावंत, ब्रिगेडियर प्रदीप शिंदे, आकाश प्रधान, पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे, सरपंच लिना राऊत, उपसरपंच विलास गावडे, शब्बीर मणियार, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, बांधकामचे अभियंता सुरेश बच्चे, पी. एफ. डॉन्टस, चंदगडचे माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, सुनिल राऊळ, काँगे्रस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, दिनेश साळगावकर, पोलीस उपअधीक्षक प्रविण चिंचळकर, रणजित देसाइ आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.पार्थिव घरी पोहोचल्यानंतर नातेवाइकांनी पांडुरंग यांचे अखेरचे दर्शन घेतले. यावेळी पांडुरंग यांच्या पत्नीला दु:ख आवरता येत नव्हते. काही काळ त्या बेशुद्ध झाल्या होत्या. वडिलांनाही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर पांडुरंग गावडे यांचे पार्थिव घराकडून अखेरच्या प्रवासासाठी रवाना झाले. घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावरच असलेल्या शेतात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी शहीद पाडुरंग गावडे यांना शासनाच्यावतीने दीपक केसरकर यांनी, तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अनिल भंडारी तसेच लष्कराच्यावतीने ब्रिगेडियर प्रवीण शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
प्रज्वलने दिला पित्याच्या चितेला अग्नी
वीर जवान पांडुरंग गावडे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या जवानांनी हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून अखेरची सलामी दिली. त्यानंतर पांडुरंग गावडे यांचा मुलगा प्रज्वल याने त्यांना मंत्राग्नी दिला. यावेळी पांडुरंग यांचा मोठा भाऊ गणपत तसेच पुतणे उपस्थित होते.
पत्नी, आईचा आक्रोश
हृदय पिळवटणारा
शहीद पांडुरंग गावडे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करताना सर्व नातेवाईक शेजारीच मंडपात बसले होते. मात्र, पांडुरंग यांच्या प्रवासाचे अखेरचे क्षण जसे जवळ येत होते, तसे पत्नी प्रांजल व आईच्या दु:खाचा बांध फुटत चालला होता. पार्थिवाला मंत्राग्नी दिला जाताच पत्नी व आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यामुळे उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.
गावडेंच्या नावाने सभागृह : केसरकर
वीर जवान पांडुरंग गावडे यांचा अभिमान आम्हाला सिंधुदुर्गवासीयांना असून, त्यांच्या नावाने आंबोली- चौकुळ येथे उचित स्मारक बांधण्यात येईल, असे सांगत लवकरच शासनातर्फे त्यांच्या नावाने हॉल बांधण्यात येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुलांचा शैक्षणिक खर्च उचलणार : राऊत
वीर जवान पांडुरंग गावडे यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा
डोंगर कोसळला आहे. शहीद गावडेंच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.