सागरी सुरक्षा धोक्यात?
By Admin | Updated: July 27, 2014 00:38 IST2014-07-27T00:34:33+5:302014-07-27T00:38:29+5:30
मच्छिमारांचा पुनरूच्चार : मालवणात नौदलाची विशेष बैठक

सागरी सुरक्षा धोक्यात?
मालवण : अनधिकृत मासेमारीमुळे सागरी सुरक्षा धोक्यात आली असल्याचा पुनरूच्चार शनिवारी नौदलाच्या बैठकीत मच्छिमारांनी केला. स्थानिक मच्छिमार नेहमीच सतर्क असतात. मात्र, शासनाचा मत्स्य आणि बंदर विभागाच्या नाकर्तेपणामुळे भविष्यात सागरी सुरक्षितता धोक्यात येवू शकते, असा आरोप मच्छिमारांनी केला. दरम्यान, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांना बगल देत बैठकीचे सोपस्कार पूर्ण केले.
शनिवारी पोलीस वसाहतीनजिक लोकमान्य बहुउद्देशीय हॉल येथे सागरी सुरक्षिततेबाबत नौदलाच्यावतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपिठावर नौदलाचे लेप्टनंट संचित कौशीक, पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, संजय कुमार, आर. एस. उपाध्याय, कस्टमचे एस. पी. धनावडे, रवींद्र उघाडे, मत्स्य विभागाचे रवींद्र मालवणकर यांसह मच्छिमारांमधून छोटू सावजी, दिलीप घारे, मिथुन मालंडकर, बाबी जोगी, जयहरी कोचरेकर, सदानंद मालंडकर, नरहरी टिकम, मोहन केळुसकर आदी उपस्थित होेते. यावेळी लेप्टनंट कौशीक म्हणाले, सागरी किनाऱ्यावरील नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. समुद्रात अथवा किनाऱ्यावर संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची तत्काळ पोलीस यंत्रणेला माहिती द्या. अलीकडच्या काळात सागरी मार्गाने अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. अतिरेकी जेव्हा घातपाताची योजना आखतात तेव्हा ते पूर्ण तयारीनीशी यामध्ये उतरलेले असतात. अतिरेक्यांचा डाव मोडून काढण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे.
किनाऱ्यावरील प्रत्येक नागरिक सुरक्षा साखळीचा घटक आहे. आपली छोटीशी मदत देश वाचवू शकते असेही कौशीक म्हणाले. पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मासेमारीसाठी समुद्रात जाताना अनोळखी बोट अथवा अनोळखी खलाशी आढळल्यास संपर्क साधा. बोटीवर खलाशांची ओळखपत्रे तसेच बोटीच्या नोंदणीची कागदपत्रे जवळ ठेवा. अधिकाऱ्यांनी बोटीची कागदपत्रे तपासल्यास त्यांना सहकार्य करा, असेही श्री. बुलबुले
म्हणाले. (प्रतिनिधी)