मार्गताम्हाणे एमआयडीसी होणारच...
By Admin | Updated: January 2, 2015 00:09 IST2015-01-01T22:32:05+5:302015-01-02T00:09:48+5:30
भास्कर जाधव : सामाजिक सभागृह, नळपाणी योजनेचे उद्घाटन

मार्गताम्हाणे एमआयडीसी होणारच...
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातील मार्गताम्हाणे (ता. चिपळूण) गोपाळवाडी येथे आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून झालेल्या नळपाणी योजना आणि सामाजिक सभागृहाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. मतभेद बाजूला ठेवून विकासाकरिता सर्वजण एकत्र येतात. त्यामुळेच या वाडीतील विकासकामे झपाट्याने मार्गी लागली, असे उद्गार आमदार जाधव यांनी काढले. मार्गताम्हाणे एमआयडीसी आणण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आधी वाडीकडे जाणारा रस्ता आणि आता एकाचवेळी विकासाची दोन महत्त्वाची कामे मार्गी लागल्याने उद्घाटनासाठी आलेल्या आमदार जाधव यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य नंदकिशोर शिर्के, पक्षाचे विभाग अध्यक्ष संदीप चव्हाण, रामपूरचे सरपंच महेश कातकर, उपसरपंच सुरेश साळवी, मार्गताम्हाणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विष्णू चव्हाण, उपसरपंच सिताराम घाणेकर, नंदू सावंत, धनंजय रावराणे, बुवा नंदिवाले, शाखा अभियंता जाधव उपस्थित होते.
वाडीतील बुजूर्ग ग्रामस्थांच्या हस्ते जाधव यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीत विरोधक एमआयडीसी मुद्दा घेऊन माझ्याविरुद्ध गावागावात फिरत होते. पण येथे येणाऱ्या प्रदूषणविरहीत टेक्स्टाईल पार्क , फळ प्रक्रिया उद्योग यामुळे खरंच काही नुकसान होणार आहे का? हे विचारण्यासाठी स्थापन झालेल्या १४ गावाच्या कमिटीनं कधीही मला चर्चेसाठी बोलावलं नाही. माझं राजकीय नुकसान झालं तरी चालेल. पण, एमआयडीसी आणणारच, असे मी निवडणुकीपूर्वी बोललो होतो. या भूमिकेशी मी आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जनतेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)