अनेक चोऱ्या उलगडणार

By Admin | Updated: November 14, 2014 23:17 IST2014-11-14T22:47:26+5:302014-11-14T23:17:25+5:30

चराठातील घटना : पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक

Many thieves will unravel | अनेक चोऱ्या उलगडणार

अनेक चोऱ्या उलगडणार

सावंतवाडी : चराठा भागात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्या करणाऱ्यास रंगेहाथ पकडल्याने आता पोलिसांची डोकेदुखी बंद होणार आहे. तसेच यामुळे अनेक चोऱ्यांचा उलगडा होणार आहे. मात्र आरोपी गणेश सांगेलकरला रंगेहाथ पकडल्याने पुन्हा एकदा सावंतवाडी पोलिसांचे वरिष्ठांकडून तसेच नागरिकांतून कौतुक होत आहे.
यात प्रामुख्याने पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद देसाई व पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बाईत यांचा समावेश आहे. चराठा येथे गेल्या चार महिन्यात लहान मोठी अशी दहा ते बारा घरे चोरट्यांनी फोडली. यातील अनेक घरातून सिलेंडरसह कपाट अशा मोठमोठ्या वस्तू चोरट्यांनी लांबविल्या. या चोरीचा अद्याप सुगावा लागला नाही. बंद घरे हीच चोरट्यांच्या निशाण्यावर राहिली असून चोरटे पोलिसांना चकवा देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या निवडत असतात. मात्र, गुरूवारची रात्र पोलिसांसाठी सुटकेचा निश्वास सोडणारी रात्र असल्याचे दिसून आले. ते पण जागरुक पोलिसामुळेच. गेले वर्षभर सावंतवाडी पोलिसांबाबत वेगवेगळे बोलले जात होते. अनेक गुन्ह्यांचा तपास होत नव्हता. शहरात महिन्यातून तीन ते चार चोऱ्या ठरलेल्या असत आणि चोरटे मिळत नव्हते.
अखेर गुरूवारी पोलिसांची ही मोहीम फत्ते झाली. तीही जागरुक नागरिकांच्या सहकार्याने. जर जॉनी फॅराव यांनी चोरट्याने घर उघडले, हे बघितले नसते तर पुढची घटना कोणालाच कळली नसती. आणि पोलीसही तेथे पोचले नसते. पण गणेश सांगेलकरच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यामुळे त्याला अलगद पकडण्यात पोलीस यशस्वी ठरले.
गणेश हा रात्री अकराच्या सुमारास चोरी करताना रंगेहाथ पकडला जाणार, या भीतीने आपली दुचाकी टाकून पळून गेला. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद देसाई व रवींद्र बाईत हे गस्तीसाठी राजवाड्यामार्गे सबनीसवाड्यात जात असताना साधले मेसच्या वळणावर गणेश सांगेलकर हा चालत येत होता. पोलिसांनी त्याला विचारले, तू कुठे गेला होतास, तर त्याने पार्टीसाठी गेलो होतो. मित्राने अर्ध्यावाटेत सोडले आता मी चालत चाललो आहे, असे स्पष्ट केले. पण पोलीस तेवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्याला गवळी तिठा येथे नेऊन त्याची पुन्हा चौकशी केली. त्याच्या खिशातील सामान तपासत असतानाच एक दुचाकीची चावी आढळून आली. त्यावरून पोलिसांनी गणेशवर शिक्कामोर्तब केले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर सर्व घटना उघडकीस आल्या. त्याने चोरीच्याच उद्देशानेच चराठा येथे गेल्याची कबुली पोलिसाकडे दिली.
यामुळे चराठा येथील अनेक चोऱ्या उघड होणार आहेत. गणेशला पकडण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद देसाई, रवींद्र बाईत, ठाणे अंमलदार केशव नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईक आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची दमदार कामगिरी
गणेश सांगेलकरला पकडल्यानंतर अनेक चोऱ्यांची उकल होणार आहे. पोलिसांनी गणेश याच्या घराची झाडाझडती घेतली. पण त्यात कोणतीही वस्तू आढळून आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, गणेश याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलीस शिपाई मिलिंद देसाई आणि रवींद्र बाईत यांनी चोराला पकडण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबाबत सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. सर्वच पोलिसांनी अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Many thieves will unravel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.