आंबा हंगामाला उशिर

By Admin | Updated: October 8, 2014 00:19 IST2014-10-07T21:48:31+5:302014-10-08T00:19:18+5:30

बेभरवशी हंगाम : बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

Mango harvesting seemingly | आंबा हंगामाला उशिर

आंबा हंगामाला उशिर

नरेंद्र बोडस- देवगड -देवगड तालुक्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबर सुरूवातीपर्यंत उशिर लावला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येपर्यंत पावसाळी वातावरण होते. सध्या ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उसंत दिली आहे. देवगड तालुक्याच्या उत्तर पट्ट्यात म्हणजे विजयदुर्ग पट्ट्यामध्ये हापूस कलमे पालवलेली दिसत आहे तर दक्षिण पट्ट्यात म्हणजे कुणकेश्वर- कातवण, मुंबरी, दाभोळे व देवगडचा किनारी भाग पालवण्याच्या प्रक्रियेपासून दूर आहे. आता हा पट्टा उशिराने पालवतो की मोहोरतो याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे यावेळेचा हंगाम बेभरवशी असेल का? या चिंतेमध्ये बागायतदार आहेत.
साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत पावसाच्या जोरामुळे आंबा कलमे पालवू लागतात. यावेळी अशा प्रकारच्या पालवीचा अभाव दिसून आला. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापासून उत्तर पट्ट्यातील कलमे पालवताना दिसून आली. आता उशिराने का होईना, पण दक्षिण पट्ट्यातील कलमे पालवतात की पालेमोहोर येतो याकडे बागायतदार लक्ष ठेवून आहेत. बहुतांश बागायतदारांनी आॅक्टोबरच्या सुरूवातीपर्यंत आंतरप्रवाही व स्पर्शजन्म (कॉन्टॅक्ट व सिस्टिमिक किटकनाशके) किटकनाशकांच्या पहिल्या फवारणीला सुरूवात केली आहे किंवा पूर्ण केलेली आहे.
सध्याच्या वातावरणानुसार नोव्हेंबर सुरूवातीपासून ते मध्यापर्यंत हापूस कलमे मोहरू लागायला हवीत, अशी बागायतदारांची अपेक्षा आहे. ज्या बागायतदारांनी संजिवकांचे डोस कलमांना दिले आहेत त्यांच्या बाबतीत तर त्यांची ही खास अपेक्षा आहे. ज्या कलमांना संजिवकांचे डोस दिलेले नाहीत, अशी कलमे सुमारे महिनाभर उशिराने म्हणजे डिसेंबरमध्ये मोहोरतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे (अर्ली फ्रक्टेशन) लवकर फलधारणेचा फायदा संजीवकाचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना मिळेलच, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काही ठिकाणी झाडे पूर्ण पालवतील तर काही ठिकाणी पालेमोहोरही येईल, अशा ठिकाणी बागायतदार पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतील. परंतु संजिवकाच्या वापराने पूर्ण मोहोर आल्यास फवारण्या व किटकनाशकांचा वापर यांचे चक्र नियोजित वेळेप्रमाणे घेता येईल,
असा विश्वासही बागायतदार व्यक्त करीत आहेत.

बागायतदारांनी दक्ष रहावे
जूनमध्ये आंबा कलमे पालवलेली नसल्यामुळे सर्वसाधारणपणे बहुतांश आंबा कलमे आॅक्टोबर मध्यापर्यंत पालवतील व त्या पालवीची काळजी घेण्यासाठी व मोहोर प्रक्र्रियेलाही सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदारांना डोळ््यात तेल घालून दक्ष रहावे लागेल, असे मत बागायतदार व व्यापारी सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mango harvesting seemingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.