आंबा, काजू विमा हप्त्यात कपात
By Admin | Updated: November 2, 2014 23:29 IST2014-11-02T21:26:59+5:302014-11-02T23:29:42+5:30
विमा संरक्षणाचे काम टाटा एआयजी कंपनी पाहणार

आंबा, काजू विमा हप्त्यात कपात
ओरोस : जिल्ह्यातील काजू व आंबा बागायतदारांना देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणासाठी वार्षिक हप्ता कमी करण्यात आला असून हा निर्णय बागायतदारांसाठी फायदेशीर आहे. विमा संरक्षणाचे काम आता कृषी विमा कंपनीऐवजी टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनी पाहणार आहे.
पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता व वेगाचे वारे यापासून आंबा व काजू या फळपिकांना निर्धारीत कालावधीत विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाते. आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्यास १ लाख रूपये तर काजू बागायतदारांना ७५ हजार रूपये नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी आंबा बागायतदारांना वर्षाला ४ हजार ८७६ रूपये तर काजू बागायतदारांना ३ हजार ६०१ रूपये हप्ता भरावा लागणार आहे. यापूर्वी आंबा बागायतदारांना वर्षाला ६ हजार रूपये तर काजू बागायतदारांना ४ हजार ५०० रूपये हप्ता भरावा लागत होता. आता या हप्त्याची रक्कम कमी करण्यात आली आहे.
या विमा योजनेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देय राहील. विमा हप्ता प्रति हेक्टरी भरावयाचा आहे. आंबा बागायतदारांना विमा हप्ता भरण्याची ३१ डिसेंबर तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. १ जानेवारी २०१५ ते १५ मे २०१५ या कालावधीत अवेळी पाऊस झाला. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीच्या कालावधीत जास्त तापमान झाले तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. (वार्ताहर)
काजूला नुकसान भरपाई
१ डिसेंबर २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत अवेळी पाऊस तसेच जास्त तापमान झाले तर काजू बागायतदारांना ७५ हजार रूपये विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा योजनेचा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षकांच्यावतीने करण्यात आले आहे.