वाढत्या उष्म्याने आंबा ढागाळला, बागायतदारांना फटका 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 27, 2024 01:33 PM2024-04-27T13:33:02+5:302024-04-27T13:33:19+5:30

महेश सरनाईक हवामान बदलाचा फटका कोकणातील आंबा , काजू, कोकम, नारळ, सुपारी या सर्वच पिकांना बसत आहे. सध्या उष्णतेचा ...

Mango, cashew, kokum, coconut, betel nut crops in Konkan affected by climate change | वाढत्या उष्म्याने आंबा ढागाळला, बागायतदारांना फटका 

वाढत्या उष्म्याने आंबा ढागाळला, बागायतदारांना फटका 

महेश सरनाईक

हवामान बदलाचा फटका कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी या सर्वच पिकांना बसत आहे. सध्या उष्णतेचा कडाका वाढल्याने याचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे झाडावरील आंबा ढागाळत आहे. तर काढून ठेवलेले फळ दोन दिवसांत परिपक्व होत आहे. तर शेवटच्या टप्यातील छोट्या कैऱ्याही भाजल्यासारख्या पिवळसर दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मोठे नुकसान होत असून आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काढून ठेवलेला आंबा त्वरित बाजारपेठेत न गेल्यास त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना सोसावा लागत आहे.

मागील काही दिवसांपासून उष्णतेचा कडाका वाढला आहे. परिणामी तापमान वाढण्यास सुरूवात झाली असून उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचा पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. काही भागात तर पारा ४० अंशाच्या वर आहे. तो आणखी वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. आधीच अंगाची लाहीलाही होत असताना पुढील पाच दिवस उकाडा अधिक वाढणार असून कमाल तापमानात तीन ते पाच अंशांतनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्याच्या बहुतांश भागातील तापमान सरासरी ३५ अंशांपेक्षा अधिक वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा पिकास बसण्यास सुरूवात झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून तापमान वाढल्यामुळे काही ठिकाणी आंब्याची फळे उष्णतेने भाजल्यासारखी दिसत आहेत.

कोकणचे अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून असते. मात्र, हेच आंबापीक अधिकच्या उष्णतेमुळे आता होरपळून निघत आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सूर्यनारायण कोपल्यासारखी स्थिती आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे. हापूस आंब्याला वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून आता झाडावर असलेल्या छोट्या कैऱ्या गळून पडत आहेत. काढून ठेवलेला आंबा ढागाळत आहे. कोकणच्या हापूसचे शेवटच्या टप्प्यातील फळ धोक्यात आले आहे. तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याच्या बातमीने शेतकरी, बागायतदारांची झोपच उडाली आहे. ते चिंताग्रस्त बनले आहेत.

आंबा बागायतीचा फळधारणेचा ७० टक्के हंगाम जवळपास पूर्णत्वास आला असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात आंब्याचे साधारणपणे ३३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील २२ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर आंबा पीक घेतले जाते. जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान चांगला प्रकारचा मोहोर आंबा बागायतींना आला होता. त्यामुळे आंबा बागायतदारही आनंदात होते. पहिल्या टप्प्यात आलेले आंबा पीक बागायतदारांना उत्पादन मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरले. मात्र, अलीकडे वाढत असलेली उष्णता आंबा बागायतदारांसाठी चिंतचे कारण बनत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कडक उष्णतेला सुरूवात झाली. त्यामुळे आंबा बागायतीला आलेली फळे करपण्याची भीती निर्माण झाली होती. जास्त उष्णतेमुळे आंबा पिकांवर जळलेल्या स्वरूपाचे चट्टे येऊ लागले आहेत. छोटी फळे गळून पडत आहेत. या पडलेल्या फळात फळमाशी आसरा घेत आहे. त्यानंतर झाडे व कलमांवर लटकत असलेल्या आंब्यावरही फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हीच फळमाशी आंब्याचा देठ कमकुवत करून पुन्हा फळगळतीस कारणीभूत ठरतो. या सर्व प्रक्रियांचा एकंदरीत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या आंबा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ६० टक्के आंबापीक बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. स्थानिक विक्रेत्यांकडून अडीचशे ते तीनशे ते साडेतीनशे प्रती डझन अशा विक्री दरात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. मोठ्या आकाराचा हापूस साडेचारशे ते पाचशे रुपये प्रतिडझन, तर मध्यम आकाराचा तीनशे-साडेतीनशे ते चारशेच्या प्रति डझन उपलब्ध झाला आहे. यात पायरी आंबा साडेतीन ते चारशेच्या रुपये प्रतिडझन त्यात रायवळ आंबा शंभर रुपये डझनने उपलब्ध झाला आहे. सर्वसाधारण ग्राहकाला स्थानिक विक्रेत्याकडून सध्याच्या हंगामात अडीचशे ते तीनशे प्रतिडझन बाजारभाव आहे. गतवर्षी या कालावधीत हा दर चारशे ते पाचशे रुपये डझन असा चांगला बाजारभाव होता. परंतु यंदा असलेल्या बाजारभावाचा दर लक्षात घेता आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे लक्षात येत आहे.

Web Title: Mango, cashew, kokum, coconut, betel nut crops in Konkan affected by climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.