मणेरी पाईपलाईनचे काम निकृष्ट
By Admin | Updated: May 21, 2015 00:04 IST2015-05-20T22:24:14+5:302015-05-21T00:04:31+5:30
दर्जेदार नसल्याचा ठोस पुरावा : जीवन प्राधिकरणचे पितळ उघडे

मणेरी पाईपलाईनचे काम निकृष्ट
कसई दोडामार्ग : मणेरी येथून नदीचे पाणी उपसा करून वेंगुर्ले येथे नेण्यासाठी पाईप लाईनची टेंडर देण्यात आली. पाईप लाईन फुटली आणि जीवन प्राधिकरणचे पितळ उघडे पडले. पाईपलाईनचे काम दर्जेदार झाले नसल्याचा हा ठोस पुरावा असल्याने काम त्वरित बंद करून दर्जेदार काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तिलारी नदीचे पाणी मणेरी नदीतून उपसा करून वेंगुर्ले येथे नेण्याची जीवन प्राधिकरणची योजना सुरू आहे. मणेरी ते बांदा, बांदा ते वेंगुर्ले राज्यमार्गाची साईडपट्टी खणून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. जमिनीला लागूनच पाईपलाईन टाकण्यात येत असून, नंतर पाईपला वेल्डिंग मारण्यात येते. मात्र, पाईपलाईन जमिनीबरोबर असल्याने खालून पाईपला वेल्डिंग मारणे अशक्य आहे. असे असताना वेल्डिंग मारण्यात आले, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. तसेच वेल्डिंग मारलेल्या ठिकाणी सिमेंट लावण्यात आले. तसेच पाईप जॉर्इंटच्या ठिकाणी लहान साईजचे दर्जेदार नसलेले पाईप वापरण्यात येत आहे. सासोली येथे जॉर्इंटचा पाईप फुटल्याने पाईपचा दर्जा स्पष्ट झाला. एकंदरीत काम एस्टिमेंटप्रमाणे न झाल्याने पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाईनचा आम्हाला धोका आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाईपलाईन टाकताना जमीनमालकांची परवानगी घेणे आवश्यक होते. जमीनमालकांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक होते. रस्ता बांधकाम विभागाचा असला, तरी जमिनी नाहीत. लोकांच्या सेवेसाठी म्हणून हा रस्ता बांधकाम विभागाला दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे या लाईनचे काम बेकायदेशीर होत आहे. याच्याशी काहीही संबंध नसलेल्या लोकांना केवळ गप्प राहण्यासाठी लाखो रुपये देण्यात आले. नाहरकत दाखल्यांसाठी पैसे मोजण्यात आले. मात्र, खरोखरच जे रस्त्याचे मालक आहेत, त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली, असे आरोप होत आहे. त्यामुळे या पाईपलाईनचे काम बंद करावे. प्रकल्पाची एस्टिमेंट कॉपी सर्वांसाठी खुली करावी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुन्हा काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)