सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू
By Admin | Updated: August 11, 2014 00:20 IST2014-08-10T21:23:28+5:302014-08-11T00:20:25+5:30
८ आॅगस्ट ते २२ आॅगस्टपर्यंत या १५ दिवसांसाठी

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू बांधवांचा रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला उत्सवाचे सर्व कार्यक्रम तसेच स्वातंत्र्यदिनाचे सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) प्रमाणे ८ आॅगस्ट ते २२ आॅगस्टपर्यंत या १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या कालावधीत जिल्हा दंडाधिकारी, सिंधुदुर्ग ई. रविंद्रन यांनी प्राप्त असलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) प्रमाणे ८ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई केली आहे.
या कालावधीत ३७ (१) अन्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीची किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलटून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येईल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे अगर हावभाव करणे अगर सोंग आणणे अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांत प्रसार करणे.
तसेच कलम ३७ (३) अन्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे, हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपर्निदीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना आणि लग्न आदी धार्मिक समारंभ, अंत्ययात्रा यास लागू पडणार नाही. वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधीकृत केलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील.
या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. (प्रतिनिधी)