मंडणगड जिल्हा निर्मितीच्या हालचाली

By Admin | Updated: November 6, 2014 22:06 IST2014-11-06T21:31:49+5:302014-11-06T22:06:03+5:30

महसूल व वन विभागाची गांधी यांना माहिती

Mandangadh District creation activities | मंडणगड जिल्हा निर्मितीच्या हालचाली

मंडणगड जिल्हा निर्मितीच्या हालचाली

खेड : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची पुनर्रचना करून मंडणगड हा नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे़ नव्या जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वन विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयातील महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी शरद डाके यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे़
खेड येथील मंडणगड जिल्हा निर्माण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत गांधी यांनी लेखी पत्राद्वारे याबाबत ही माहिती मागितली होती. त्याबाबतचे लेखी पत्र गांधी यांना प्राप्त झाले आहे़
मंडणगड जिल्हा निर्मिती करण्यासंबंधात विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्ऱ २०१४ /प्रक्र. ८७/म-१० दि. २४ जून २0१४ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आल्याची माहिती या पत्रात दिली आहे़ अ‍ॅड. गांधी यांनी आपल्या पत्रात मंडणगड जिल्ह्याच्या निर्मितीमागील आवश्यकता आपल्या पत्रात विषद केली होती़ रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांना जिल्ह्याचे ठिकाण तसे दूरवर आहे. जिल्ह्याच्या एका टोकाला हे तालुके आहेत़ तसे खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ हे तालुके मागास राहीले आहेत़ या तालुक्यांचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालय हे रत्नागिरी येथे आहे़
खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ संपर्काच्या दृष्टीने अवघड होत असल्याने हे तालुके आजही मागास राहिले आहेत. शासकीय कामे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आहे, अशीच परिस्थिती श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांची आहे़
भौगोलिक रचनेमुळे तसेच खर्चाचे दृष्टीने अधिक व सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याने बहुतांश लोकांवर अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील या ८ तालुक्यांना मंडगणगड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मंडणगड हा नवा जिल्हा केल्यास या भागातील सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़ अशा आशयाच्या या पत्राचा मंत्रालयीन पातळीवर विचार झाल्याने समाधान व्यक्त होत आहे़ एक प्रकारे मंडणगड या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीकडे प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. गांधी यांनी केली आहे.
गांधी यांना आलेल्या पत्रातून मंडणगडच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय भविष्यात महत्त्वाचा ठरू शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: Mandangadh District creation activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.