मालवणच्या '१०० इडियट्स'चे 'सोशल' कार्य
By Admin | Updated: May 25, 2016 23:25 IST2016-05-25T21:56:06+5:302016-05-25T23:25:15+5:30
‘व्हॉट्स अॅप ग्रुप’च्या माध्यमातून : संविता आश्रमाला ३० हजारांची मदत

मालवणच्या '१०० इडियट्स'चे 'सोशल' कार्य
मालवण : सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यात तरुणाई भरकटत चालली आहे. फेसबुक, व्हाट्स अॅप, आदी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सदुपयोग करण्यापेक्षा दुष्परिणाम अधिक होतो. यात युवा पिढीला 'याड' लागल्याची ओरड होते. यात काही तिळमात्रही शंका नाही. असे असले तरी मालवणच्या '१०० इडियट्स'नी मात्र युवा पिढी आणि समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
सामाजिक चळवळीत आपलंही थोडं योगदान राहावं, या उद्देशाने मालवणच्या तरुणांनी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून तब्बल ३0 हजार रुपये जमा करीत पणदूर येथील संविता आश्रमला मदत केली आहे. या '१00 इडियट्स' ग्रुपचे अॅडमिन सीझर डिसोजा यांच्या हस्ते सोमवारी संविता आश्रमचे संदीप परब यांच्याकडे मालवण येथे ही मदत देण्यात आली.
या माध्यमाच्या दुष्परिणामांची कितीही चर्चा होत असली तरी या माध्यमाचा सदुपयोग केल्यास सामाजिक चळवळीसाठी त्याचा फार मोठा हातभार लागू शकतो, हे मालवण मधील ‘१०० इडियट्स’ व्हॉट्स अॅप ग्रुपने दाखवून दिले. त्यामुळे 'सोशल' मीडियासह त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढदिवस साजरा न करता तब्बल जमा झालेले ३० हजार रुपये त्यांनी अणावच्या संविता आश्रमास मदत स्वरूपात सुपूर्द केले.
यावेळी राजू बिडये, अभय कदम, मयू पाटकर, पास्कोल पिंटो, ऋषी बिडये, हरेश देऊलकर, महेश सारंग, सदू आचरेकर, जॉमी ब्रिटो, नुपूर पाटील, विली डिसोजा, नीलेश गवंडी, युवराज चव्हाण व सदस्य उपस्थित होते.
अन् क्षणात राहिले
३० हजार रुपये उभे
मालवण येथील काही युवकांनी एकत्र येत या व्हॉट्स अॅप ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपमधील एका सदस्याचा सोमवारी वाढदिवस होता. मात्र, हा वाढदिवस आगळावेगळा करण्याचा संकल्प या युवकांनी केला. त्यानुसार मयू पाटकर, राजेश पारधी यांनी या वाढदिवसानिमित्त पार्टी, भेटवस्तू असा वायफळ खर्च न करता जिल्ह्यात अनाथांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या 'संविता आश्रमा'स काही मदत देण्याची संकल्पना मांडला. ही संकल्पना सर्व सदस्यांच्या पसंतीस उतरल्याने बघता बघता काही क्षणात तब्बल ३० हजारांची रक्कम उभी राहिली.