मालवणचे रुग्णालय ‘संजीवनी’च्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 27, 2015 00:32 IST2015-07-26T22:29:16+5:302015-07-27T00:32:48+5:30
वैैद्यकीय सुविधांची वानवा : सत्ताधारी, स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था-- आरोग्याचे तीन तेरा

मालवणचे रुग्णालय ‘संजीवनी’च्या प्रतीक्षेत
सिद्धेश आचरेकर - मालवण -पर्यटन शहर असलेल्या मालवण शहरात वैद्यकीय सेवा-सुविधांची वानवा आहे. मालवण तालुक्यातील जनतेचा आधार असणारे ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जशी अवस्था असते, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था झाली आहे. अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या या रुग्णालयाला ‘नवसंजीवनी’ मिळणे आवश्यक आहे. मात्र, सत्ताधारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची असलेली अनास्था यामुळेच की काय ग्रामीण रुग्णालयाला ‘अच्छे दिना’पासून दिवसेंदिवस वंचित राहावे लागत आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालय हे नेहमीच जिल्ह्यात या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. कधी वैद्यकीय अधिकारी मारहाण प्रकरण, तर कधी डॉक्टरांअभावी होणारी रुग्णाची हेळसांड. ग्रामीण रुग्णालयाला भविष्यात अद्ययावत सेवा सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून होत आहे. कारण आजमितीस सुसज्ज ग्रामीण रुग्णालय झाल्यास तालुक्यातील जनतेची होत असलेली परवड दूर होईल. ग्रामीण रुग्णालयात एकमेव वैद्यकीय कार्यरत असल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने दिवस-रात्र त्यांना ‘आॅन ड्यूटी २४ तास’ करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयाचे नवीन शल्यचिकित्सक यांनी ग्रामीण रुग्णालयांच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालय हे सीआरझेडच्या विळख्यात असल्याने कर्मचारी क्वाटर्स अद्याप उभे राहू शकले नाहीत. शासनाकडून क्वाटर्ससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सीआरझेड कायद्याच्या कात्रीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वस्तीस्थानचे बांधकाम अडकले आहे. पालकमंत्री, आमदार व खासदार यासह लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून प्रश्न निकाली काढावा, असा सूर कर्मचाऱ्यांतून उमटत आहे.
ग्रामीण रुग्णालयात लॅब टेक्निशियन पद कित्येक महिने रिक्त असल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे. सध्या कंत्राटी पद्धतीने एक टेक्निशियन उपलब्ध करून देण्यात आले असले तरी काही महिन्यांनी पुन्हा हे पद रिक्त होणार असल्याने या जागी कायमस्वरूपी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरण्यात यावे. तसेच सुसज्ज क्ष-किरण मशीन असूनही एक्स-रे टेक्निशियन कायमस्वरूपी नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. सद्य:स्थितीत आठवड्यातील तीन वार कुडाळ, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांत टेक्निशियन मालवण रुग्णालयात दुहेरी सेवा बजावत आहे. एक्स-रे टेक्निशियन कायमस्वरूपी मिळाल्यास रुग्णांची परवड रोखण्यात यश येऊ शकते. ग्रामीण रुग्णालयाला स्त्री रोगतज्ज्ञ मिळावा, अशी मागणी होत आहे. सध्या डॉ. ज्ञानेश्वर सोडल हे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या चार दिवशी महिला रुग्णांची तपासणी करतात. मात्र, केव्हाकेव्हा इतर दिवशी रुग्णांची संख्या वाढली तर महिला वर्गाची मोठी गैरसोय होते.
नया गोष्टी आहेत सकारात्मक
ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांच्या गर्तेत असले तरी स्वच्छतेत मात्र काहीसे आघाडीवर आहे.
रुग्णालय परिसर स्वच्छ असल्याचे जाणवते.
कंत्राटी पद्धतीने सफाई कम्फर नियुक्त केल्याने स्वच्छतेत रुग्णालय पुढे आहे.
रुग्णालय आवारात असलेले स्वगृह सुस्थितीत आहे.
एकाच वेळी दोन मृतदेह ठेवण्याची कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था आहे.
ग्रामीण रुग्णालयात अधिकारी, कर्मचारी यांची संख्या कमी असली तरी शस्त्रक्रिया विभाग आणि क्ष-किरण विभाग चांगल्या दर्जाचे आहे. परंतु, तंत्रज्ञ नसल्याने पंचाईत होते.
कार्यालयाचा भार एकटीवरच
रुग्णालयाचे कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी केवळ एकच अधीक्षक कार्यरत आहेत. कनिष्ठ लिपिक व सहायक अधीक्षक पद रिक्त असल्याने रुग्णालयाचा कार्यालयीन भार अधीक्षक श्रीमती पाटकर यांच्यावर आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयातील दफ्तरी माहिती तसेच इतर माहिती मिळत नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. जुन्या इमारतीतच ती ‘रेकॉर्ड रूम’ असून, नवीन इमारतीत त्यासाठी खोली नसल्याचे समजते.
रुग्णवाहिका नादुरुस्त
ग्रामीण रुग्णालयाची अवस्था एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे झाल्याची स्थिती आहे. रुग्णांना अधिक उपचारांसाठी इतरत्र नेण्यासाठी असणारी रुग्णवाहिका नादुरुस्त स्थितीत आहे. जिल्हा रुग्णालयाकडून मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तीही रामभरोसेच आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेचा आर्थिक भुर्दंड पडतोच, त्याबरोबर वेळेत न पोहोचल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.