साहीलला जेरबंद करुनच मकेश्वर यांनी पिच्छा सोडला...!
By Admin | Updated: July 29, 2015 21:58 IST2015-07-29T21:58:49+5:302015-07-29T21:58:49+5:30
आपल्या नेटवर्कच्या बळावर जेलमधून पळालेल्या ३ नामचीन गुंडांना जेरबंद करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.

साहीलला जेरबंद करुनच मकेश्वर यांनी पिच्छा सोडला...!
सुभाष कदम -चिपळूण -गुन्हेगार कितीही सराईत असला किंवा नामचीन असला तरी त्याला पकडण्याचा विडा उचलणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती किती तीव्र आहे, त्यावर त्या अधिकाऱ्याचे यश अवलंबून असते. जिल्हा पोलीस दलात चिपळूणचे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रमोद मकेश्वर यांच्याबाबतीतही तसेच घडले. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व आपल्या नेटवर्कच्या बळावर जेलमधून पळालेल्या ३ नामचीन गुंडांना जेरबंद करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.
पोलीस दलाबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जातात. अनेकवेळा पोलिसांवर संशय व्यक्त केला जातो. पोलीस लाचखाऊ असतात, असा शब्द परवलीचा बनला आहे. त्यामुळे समाजातील पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. चिपळुणातील काही पोलीस साहील कालसेकरला मदत करतात, असा आरोपही होत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी ठरलेल्या कालसेकरला अटक करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. साहीलने पोलीस कॉन्स्टेबल उदय वाजे यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी जमावाने त्याला बेदम मारले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवले असतानाच पोलिसांची नजर चुकवून १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्याने पलायन केले होते. पोलीस त्याच्या मागावर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी याप्रकरणी साहीलला त्वरित जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना साहीलच्या सवयी व साहीलबाबत अधिक माहिती असल्याने त्यांच्यावर जास्त विश्वास टाकून या मोहिमेचे सूत्र जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्याकडे सोपवली होती. मकेश्वर यांनी सापळा रचला होता. सुरुवातीला दोन दिवस अंदाज आला नाही. परंतु, नंतर तो मुंबईत गेला आणि चक्रे वेगाने फिरली. मकेश्वर व त्यांचे सहकारी स्वत: मुंबईत गेले. तेथे त्यांनी ४ टॅक्सी बुक केल्या होत्या. स्वत: मकेश्वर मुंडन करुन मिशी काढून वेश बदलून मिशनवर जाणार होते. तोच साहील मुंबईतून देवरुख येथे आला. साहील वापरत असलेल्या सीमची माहिती पोलिसांना मिळाली. तो सातत्याने सीम बदलत होता. त्याचा मागोवा पोलीस घेत होते. स्वत:ला हुशार समजणाऱ्या साहीलवर पोलिसांची करडी नजर होती. परंतु, तो रेंजमध्ये येत नव्हता. साहीलने या काळात पैशासाठी अनेकांना फोन केले. ते सर्व कॉल ट्रेस करण्यात आले. अखेर देवरुख येथील एका व्यक्तीशी साहीलने संपर्क साधला. याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी संबंधित व्यक्तीला गाठले. साहील पुन्हा पैसे नेण्यासाठी त्या व्यक्तीकडे येणार होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन साहीलसाठी सापळा रचला होता. या सापळ्यात साहील अलगद सापडला.
मकेश्वर यांनी अत्यंत हुशारीने साहीलला जेरबंद केले. साहीलच्या हाती पैसे मिळाले असते किंवा दोन दिवस उशीर झाला असता तर तो अजमेरला पळाला असता. तेथे तो फुकट जगला असता आणि आमचा ताप अधिक वाढला असता. मग त्याला शोधणे कठीण होते, असे पोलीस निरीक्षक मेकश्वर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन व नागरिकांनी केलेले सर्वतोपरी सहकार्य यामुळे हे शक्य झाल्याचे मकेश्वर यांनी सांगितले. यांच्या विश्वासामुळेच आपण हे आव्हान लिलया पेलल,े असेही मकेश्वर म्हणाले.
घरफोडी प्रकरणातील किरण मोरे, बलात्कारप्रकरणी रितेश कदम व आता विविध गुन्ह्यातील साहील कालसेकर हे तिन्ही आरोपी पळून गेले होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी हे तिन्ही आरोपी पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे त्यांनी अनोखी हॅटट्रिक नोंदवली आहे. या कामगिरीबद्दल मकेश्वर यांचे अभिनंदन होत आहे.
बुधवारचा योगायोग...
साहील कालसेकर बुधवारी जिल्हा रुग्णालयातून पळाला आणि पोलिसांनी त्याला बुधवारीच पकडले. पोलीस दलाची या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झाली होती. चार कर्मचारी निलंबित होते. आता साहील पकडला गेल्याने पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले आहे.