रुग्णसेवेतून इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करा
By Admin | Updated: January 5, 2015 00:39 IST2015-01-04T22:14:10+5:302015-01-05T00:39:05+5:30
विनायक राऊत : पडवे येथील शपथविधी समारंभात मार्गदर्शन

रुग्णसेवेतून इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करा
सिंधुदुर्गनगरी : परिचारिका हा पेशा आहे. ती नोकरी किंवा आपला व कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा व्यवसाय नाही. ती एक ईश्वरसेवा आहे आणि ही ईश्वरसेवा आपण रुग्ण सेवेच्या माध्यमातून करून तुमच्या बरोबरच इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करा, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी नर्सिंग कॉलेज कसालच्या पडवे येथील कार्यक्रमात बोलताना केले.
श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग कसाल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, गावराई सरपंच मनोरमा परब, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका नूतन खांडेपारकर, उपमुख्याध्यापक संजय रहाणे, संस्था विश्वस्त साळुंखे, सचिन परब, नागेंद्र परब, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नर्सिंग कॉलेज प्रांगणात बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, तर कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, आता तुम्ही सर्व परिचारिका अभ्यासक्रम संपवून नवीन विश्वात जाण्यास सज्ज झाला आहात. शपथ ग्रहण करण्याचा आजचा हा कार्यक्रम यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व आपल्या जीवनात फार वेगळे आहे. कारण इतर सर्व पेशांपेक्षा परिचारिका हा पेशा वेगळा आहे.
केवळ चरितार्थ चालविण्यासाठीचा हा पेशा नाही तर एक सेवा आहे. ती नोकरी नाही. ही ईश्वरसेवा आहे आणि ती रुग्णसेवेच्या माध्यमातून आपण करणार आहात. आपल्यासमोर येणारा प्रत्येक रुग्ण
हा ईश्वर असून, त्याची सेवा करणे
हेच आपले प्रथम कर्तव्य राहणार
आहे हे लक्षात ठेवून जीवनात मार्गक्रमण करा. म्हणजे आज शपथ घेताना जो दीप तुम्ही पेटवलात
त्याचा प्रकाश तुमच्याबरोबरच इतरांच्याही जीवनात निर्माण कराल. (प्रतिनिधी)
कॅम्पस इंटरव्ह्यूची व्यवस्था व्हावी
सध्या शिक्षणाची आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरची अनेक दालने खुली
आहेत. मात्र, ती डोळसपणे पाहून योग्य शिक्षण आणि योग्य करिअर निवडले, तर
यश आपल्यापासून दूर नाही असे सांगतानाच परिचारिकांसाठी खूप मागणी आहे.
त्यासाठी या अशा कॉलेज कॅम्पसमध्येच गोवा, मुंबई, पुणे आदी भागांतील मोठमोठ्या रुग्णालयांना बोलावून इंटरव्ह्यूची व्यवस्था व्हावी अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त करतानाच आपल्याला पुढील काळात नोकरी वा अन्य कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास मला हाक मारा. आपल्या मदतीसाठी आपण सर्वांचा भाऊ म्हणून उपस्थित राहीन, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.