फळप्रक्रिया उद्योगातून आर्थिक प्रगती साधा
By Admin | Updated: July 10, 2015 22:00 IST2015-07-10T22:00:52+5:302015-07-10T22:00:52+5:30
सुधीर झांटये : वेंगुर्ले येथील पारितोषिक वितरणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

फळप्रक्रिया उद्योगातून आर्थिक प्रगती साधा
वेंगुर्ले : परिश्रम करा आणि यशस्वी व्हा. तुमचे पालक तुमच्यासाठी मेहनत करीत असतात याची जाणिव ठेवा. जगाच्या पाठीवर कोकणातील फळांसारखा मेवा मला कोठेच आढळला नाही. यासाठी फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो, असे उद्गार उद्योगपती सुधीर झांटये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे उद्योगपती सुधीर झांटये व समीर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी झांटये बोलत होते. सुधीर झांटये यांनी आपल्या यशस्वी उद्योजकतेबद्दल माहिती दिली. जगातील १९ देशांमध्ये प्रवास करताना आलेले अनुभव कथन केले. तसेच ज्यांना उद्योगक्षेत्रात आपल्या अनुभवाची गरज आहे, त्यांना तो विनामूल्य देण्याचेही अभिवचन दिले. यावेळी संस्थेला ११ हजार रुपयांची देणगी दिली.
बाविसाव्या वर्षी सी.ए., सी.एस. या पदव्या संपादन केलेले तरुण अभ्यासू व्यक्तिमत्त्व समीर कुळकर्णी यांंंंंंंंंंंंनी विद्यार्थ्यांना आपण पुढे कोण होणार, हे दहावीच्या परीक्षेपूर्वी निश्चित करून त्याक्षेत्राची परिपूर्ण माहिती करून घेण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर अचूक नियोजन, जिद्द, इच्छाशक्ती व प्रयत्न या चतु:सूत्रीचा वापर करा, म्हणजे यश निश्चित येईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी चांगले इंग्रजी व संगणकीय अद्ययावत
ज्ञान संपादन करावे, असे
सांगितले.
कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अॅड. सूर्यकांत खानोलकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी सुदत्त कल्याण निधीच्या देणगीतून स्व. सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार प्रा. प्रकाश देसाई यांना देण्यात आला. इयत्ता पहिली ते नववीपर्यंत प्रथम येणाऱ्या मुलांना तसेच दहावी शालांत परीक्षेत जिल्ह्यातून विद्यार्थ्यांमधून प्रथम तसेच विद्यार्थिनींमधून प्रथम आलेल्यांना आणि वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम व वेंगुर्ले केंद्रातून प्रथम आलेल्या, तसेच वेंगुर्ले केंद्रात बारावी परीक्षेत चारही शाखांतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी द्वारकानाथ घुर्ये यांच्या देणगीतून उत्कृष्ट खेळाडू म्हणून सई पोकळे हिला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच हुशार विद्यार्थिनी म्हणून केतकी मोर्डेकर हिला पारितोषिक देण्यात
आले.
अनिल सौदागर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याकडील गुणवत्तेचा वापर करून उज्ज्वल यश संपादन केल्यास आम्हाला व दात्यांना समाधान लाभेल असे सांगितले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी शांताराम बांदेकर, नंदन वेंगुर्लेकर, सुमन परब, सुशीला खानोलकर उपस्थित होते.
(प्रतिनिधी)