विकासच प्रचाराचा प्रमुख मुद्दा : राणे
By Admin | Updated: September 2, 2014 23:17 IST2014-09-02T23:16:27+5:302014-09-02T23:17:08+5:30
पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथे प्रचारसभा होणार

विकासच प्रचाराचा प्रमुख मुद्दा : राणे
कणकवली : उद्योग, शिक्षण, आय.टी, शेती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. जनतेला सुखी करून लोककल्याणकारी राज्य काँग्रेस आघाडीच देऊ शकते. गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, अशी माहिती काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
दरम्यान, मुंबईमध्ये सोमवारी प्रचाराचा प्रारंभ झाला असून, यापुढे पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या महानगरांमध्ये आणि ग्रामीण भागात प्रचारसभा होतील, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. पालकमंत्री नारायण राणे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आज, मंगळवारपासून दाखल झाले. यावेळी त्यांनी कणकवली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभेतील काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेबाबत माहिती दिली. राणे म्हणाले, काँग्रेस पक्ष अतिशय संयमी, आक्रमकरीत्या प्रचाराचा झंझावात महाराष्ट्रात राबविणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत केलेली विकासकामे, प्रगती, दुष्काळी परिस्थितीत आठ ते नऊ हजार कोटी रुपयांची मदत हे प्रमुख मुद्दे असतील. काँग्रेसने पंधरा वर्षांत विकास केला, प्रगती केली, तसेच पुढे करण्याची क्षमता काँग्रेसमध्येच आहे. विरोधकांकडे राज्य चालविण्याची क्षमता असलेली व्यक्तीच नाही. हे राज्य कायमच प्रगतीमध्ये अव्वल ठेवण्याचे काम काँग्रेसच करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करूनच लढतील
जरी दोन्ही पक्षांनी २८८ मतदारसंघांत आपआपल्या कार्यकर्त्यांकडून अर्ज मागितले असले, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करूनच निवडणुकीला सामोरे जातील. जागा वाटपाबाबत बोलणी सुरू आहे. आघाडी झाल्यानंतरच जागांबाबतची माहिती देण्यात येईल. काही जागांची अदलाबदलदेखील होईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.
मोदींवर जनता नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभर दिवसांच्या कालावधीबाबत बोलताना राणे म्हणाले, निवडणुकीदरम्यान मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. महागाई वाढली आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणणाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे आम जनता मोदींवर नाराज आहे. तसेच भाजपअंतर्गत मतभेद, हुकूमशाहीपणा या गोष्टी देशाच्या हिताच्या नाहीत, हे जनतेला कळून चुकले आहे.
९ पासून आचारसंहिता
आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता ८ ते ९ सप्टेंबरपासून लागेल, असे राणे म्हणाले.
खासदार अज्ञानी
विनायक राऊत अज्ञानी खासदार आहेत. ‘सी वर्ल्ड’बाबत काही लोकांना घेऊन विरोध ते करीत असतील तर प्रथम ‘जैतापूर’चे काय झाले ते पाहा. शिवसेनेने ‘जैतापूर’ला विरोध केला आणि मोदींनी मुंबईत जैतापूर झाला पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यामुळे राऊत यांनी ‘सी वर्ल्ड’ होऊ देणार नाही अशी भूमिका घेताना आपली ताकद तपासावी. ‘सी वर्ल्ड’ कसा योग्य आहे हे आपण स्थानिक जनतेला समजावेन, असे राणे म्हणाले.