महायुतीला विजयी करण्याचे मुख्य ध्येय
By Admin | Updated: July 18, 2014 22:55 IST2014-07-18T22:52:06+5:302014-07-18T22:55:20+5:30
दिवाकर रावते : धामापूर येथे केले प्रतिपादन

महायुतीला विजयी करण्याचे मुख्य ध्येय
चौके : जनतेमध्ये विश्वास निर्माण करून जनतेची सेवा करणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे व्रत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला पराभूत करायचे यापेक्षा महायुतीला विजयी करणे हेच मुख्य ध्येय आहे. त्यासाठी जनतेशी संवाद साधा, जनता तुमच्याच पाठीशी राहील. माझे जीवन संपले तर शिवसेनेकरिता संपेल हा माझा निर्धार आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी धामापूर येथे बोलताना केले.
ते म्हणाले, शिवसेनेसाठी आजवर कोकणी माणसाने मोठा त्याग केलेला आहे. म्हणूनच शिवसेनेवर कोकणी माणसाचा तेवढाच अधिकार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार नोंदणी, शिवसेना सदस्य नोंदणी, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे उद्दिष्ट समोर ठेवून भगवा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र हा उपक्रम आपल्यावर सोपवलेला आहे. तो यशस्वीपणे राबविणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे.
शिवसेनेतर्फे धामापुरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि त्यांना छत्र्यांचे वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना रावते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, विभागप्रमुख अनिल ढोलम, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, अशोक तेली, विजयकुमार धामापूरकर, दीपा पराडकर आदी उपस्थित होते. यावेळी धामापुरातील शिवसैनिकांच्यावतीने आमदार रावते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांना शिवबंधन बांधण्यात आले. तसेच नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)