अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
By Admin | Updated: November 24, 2015 00:24 IST2015-11-23T23:39:52+5:302015-11-24T00:24:37+5:30
आंबोली येथील प्रकरण : सावंतवाडीतून घेतले ताब्यात, दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
सावंतवाडी : आंबोली येथील विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवाजी रामू कडूकर याला चंदगड येथून रविवारी अटक केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अतूल सोनबा कडूकर (वय २१, रा. असनोली, चंदगड) याला पोलिसांनी सोमवारी सावंतवाडीतून ताब्यात घेतले. या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता २६ नोव्हेंबर पर्यत चार दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावली. आंबोली येथील विवाहितेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पिडीत महिलेने आठवड्यापुर्वी पोलिसात तक्रार दिली होती. पण पोलिसांनी या प्रकरणात प्रथम थोडीशी सावध भूमिका घेतली होती. याच प्रकरणातील दिपक रावराणे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. त्यामूळे पोलिसांवर आरोपही झाले, मात्र गेले दोन दिवस तपासाची वेगाने सूत्रे फिरवत पोलिसांनी या प्रकरणातील शिवाजी रामू कडूकर (वय ३८) याला रविवारी चंदगड येथील घरातून ताब्यात घेतले. त्याच वेळी पोलिसांनी अतुल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याना तो घरात सापडला नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी अतुल सोनबा कडूकर याला सोमवारी हजर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तो सावंतवाडीत येताच त्याला अटक करण्यात आली. या दोघानाही येथील न्यायालयात हजर केले असता २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केल्याने आता दिपक रावराणेबाबत पोलिस काय भूमिका घेतात? याबाबतचा पोलिसांचा तपास सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. तर दुसरीकडे अत्याचारित महिलेला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी बोलवूनही ती अद्यापपर्यंत आली नसल्याने पोलिसांजवळ वैद्यकीय तपासणीचा पेच कायम असून पोलिस आणखी एकदा अत्याचारित महिलेला लेखी देणार असून त्यानंतर ही महिला आली नाही, तर याबाबतचा अहवाल पोलिस न्यायालयाला देणार आहेत. (प्रतिनिधी)
‘सखोल अभ्यास करणार’
पोलिस आंबोली लैगिक अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास करणार असून या प्रकरणातील अनेक दुवे पोलिसांजवळ उघड होत आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये हे प्रकरण घडल्यानंतर एक वर्ष तक्रार का देण्यात आली नाही. तसेच तक्रार देण्यापूर्वी काय घडले याचीही माहिती घेण्यास सुरूवात केल्याचे पोलिस उपनिरिक्षक तोरस्कर यांनी स्पष्ट केले.
आरोपींना कोणत्या उद्देशाने बोलावले होते
पोलिसांना आरोपींनी तक्रार दाखल होण्यापूर्वी काही दिवस अगोदर सावंतवाडीत एका घरात बैठक झाल्याची माहिती दिली असून या बैठकीत कोण कोण हजर होते याची माहिती आता पोलिस घेत असून या सर्वांचा जबाब नोंदवणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.