महेंद्र मयेकर जुलैमध्ये नगराध्यक्षपद सोडणार?
By Admin | Updated: June 12, 2015 00:42 IST2015-06-11T23:12:37+5:302015-06-12T00:42:14+5:30
रत्नागिरी पालिका : सव्वा वर्षाचा अखेरचा टप्पा शिवसेनेचा

महेंद्र मयेकर जुलैमध्ये नगराध्यक्षपद सोडणार?
प्रकाश वराडकर -रत्नागिरी--रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदावर शेवटचे सव्वा वर्ष शिवसेनेचा अलिखित हक्क आहे. त्यासाठी सेनेतील अनेकजण इच्छुक आहेत. नाट्यमयरित्या नगराध्यक्ष बनलेले महेंद्र मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी २४ जुलै रोजी पूर्ण होत असून, त्यांनी नगराध्यक्षपद सोडण्यासाठी युतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा त्यांच्यावर दबाव वाढत आहे. परंतु उर्वरित सव्वा वर्ष नगराध्यक्षपदी राहण्यासाठी महेंद्र मयेकरही पटावरील सोंगट्या हलविण्यात मग्न आहेत. या राजकीय बुध्दिबळात जिंकणार कोण, याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्कंठा आहे.
पावणेचार वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आली. २१ जागांवर युतीने दणदणीत विजय संपादन केला. त्यानंतर तोंडी वाटाघाटीत सेनेला सव्वा वर्षासाठी दोनदा व भाजपला दोनदा नगराध्यक्षपद देण्याचे ठरले. प्रथम सेनेचे मिलिंद कीर हे नगराध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी भाजपचे अशोक मयेकर यांना नगराध्यक्षपद मिळाले. त्यावेळी इच्छुक असलेल्या महेंद्र मयेकर यांना संधी मिळाली नाही.
अशोक मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाच विधानसभेची निवडणूक लागली. त्यामुळे शिवसेनेने भाजपला आणखी सहा महिने नगराध्यक्षपदाचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी भाजपने केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती मान्य केली. त्यावेळी उमेश शेट्ये हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. परंतु शिवसेनेतील नगरसेवकांचा त्यांना छुपा विरोध होता. त्यामुळेच भाजपला मुदतवाढ देण्यात आली. परिणामी पुन्हा अशोक मयेकर हेच नगराध्यक्ष राहणार असल्याचे स्पष्ट होताच महेंद्र मयेकर यांनी भाजपमधील ६ जणांचा वेगळा गट केला.
या राजकीय खेळीमुळे भाजपचीही कोंडी झाली. अखेर नाकदुऱ्या काढत या गटाला भाजपमध्येच स्थान देऊन गटप्रमुख महेंद्र मयेकर यांना नगराध्यक्षपद देण्यात आले. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी मयेकर यांना पाठिंबा दिला होता. मात्र, सहा महिन्यांनंतर महेंद्र मयेकर यांनी सव्वा वर्षाचा काळ पूूर्ण करण्याआधी राजीनामा देण्यास नकार दिला. आता २४ जुलै २०१५ रोजी त्यांचे सव्वा वर्ष संपत आहे. परंतु पदावरून हटण्याची मयेकर यांची तयारी नसल्याचे पुढे येताच दोन्ही पक्षातील नेत्यांकडून मयेकर यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहेत. त्याचवेळी नगराध्यक्ष मयेकर हेसुध्दा पुढील सव्वा वर्ष आपल्याकडेच नगराध्यक्षपद राहावे, यासाठी राजकीय बुध्दिबळाचा डाव खेळत आहेत.
अनेक नगरसेवकांना त्यांनी कामांच्या निमित्ताने आपल्या शब्दात ठेवल्याची चर्चा आहे. मात्र, सेनेला शेवटचे सव्वा वर्ष पद न सोडल्यास येत्या जुलै महिन्यात नगरपरिषदेत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सेनेतर्फे या पदासाठी उमेश शेट्ये, विनय मलुष्टे व मधुकर घोसाळे यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे सेनेला नगराध्यक्षपद मिळणार की नाही, हा खरा सवाल आहे.
हुकलेली संधी उमेश शेट्ये मिळवणार?
हाता - तोंडाशी आलेले रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सव्वा वर्षापूर्वी हातून निसटल्याने उमेश शेट्ये नाराज झाले होते. त्यावेळी शिवसेनेतील अंतर्गत विरोधामुुळे त्यांना नगराध्यक्षपद मिळाले नाही. राजकीय नाट्य रंगलेल्या काळात महेंद्र मयेकर यांना नगराध्यक्ष बनविण्यात उमेश शेट्ये यांचाच मोठा सहभाग होता. गेल्या वेळी हुकलेली संधी यावेळी त्यांना मिळणार की पुन्हा त्याच राजकीय स्थितीला तोंड द्यावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या नगरसेवकांमध्ये केवळ याच विषयाची चर्चा सुरू आहे.
उमेश शेट्ये यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे विनय मलुष्टे यांच्या गळ्यात मागीलवेळी नगराध्यक्षपदाची माळ पडणार होती. परंतु त्यांचे गुरु उमेश शेट्ये हेच समोर होते. दोघांनाही पद मिळाले नाही. नंतर या दोघांतील दुरावा संपला, एकत्र आले. विनय तथा भैय्या मलुष्टे हे अनुभवी व उमेश शेट्ये यांचे कार्यशैलीचा अभ्यास असलेले म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार का, याबाबतही चर्चा नगरसेवकांमध्ये रंगली आहे.