पदे देताना निष्ठा तपासली जाणार
By Admin | Updated: July 27, 2014 23:59 IST2014-07-27T23:55:33+5:302014-07-27T23:59:18+5:30
-शरद पवार १0 आॅगस्टला जिल्ह्यात

पदे देताना निष्ठा तपासली जाणार
व्हिक्टर डॉन्टस : सावंतवाडीत राष्ट्रवादीची बैठक
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँॅग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीनेही आता जिल्ह्यात आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत केसरकर हे शिवसेनेत रितसर प्रवेश करणार नाहीत, तोपर्यंत पक्षात कोणालाच पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांनी दिली. ते येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार हे १० आॅगस्टला जिल्ह्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यापुढे पदे देताना पक्षावरची निष्ठा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँॅग्रेसची खास बैठक येथील विश्रामगृहावर पार पडली. यावेळी उल्हास गावडे यांच्यासह नूतन पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष डान्टस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डान्टस म्हणाले, आम्ही जिल्ह्यात सध्या आस्ते कदम जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार केसरकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याबरोबर शिवसेनेत कोण कोण जाणार, याची चाचपणी केली जाईल. त्यानंतरच पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत अनेकांनी पक्षात थांबणार असल्याचे सांगितले आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राजन तेलींशी संपर्क
केला नाही : डॉन्टस
राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांजवळ माजी आमदार राजन तेली यांच्याबाबत शब्द टाकला, अशी चर्चा सुरु आहे. ती पूर्णत: खोटी असून, मी कुठल्याही नेत्याकडे तेलींची शिफारस केली नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष डान्टस यांनी केला आहे. तसेच तेलींनी काही प्रयत्न केले असल्यास याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
-शरद पवार १0 आॅगस्टला जिल्ह्यात
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १० आॅगस्टला सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून, त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यांचा हा दौरा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न असून कार्यकर्ते ठिकठिकाणी अध्यक्षांचे स्वागत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.