लोटेत ९४ कंपन्या प्रदूषणकारी
By Admin | Updated: January 14, 2015 00:32 IST2015-01-13T23:56:02+5:302015-01-14T00:32:08+5:30
आरोग्य समिती सभा : पर्यावरण मंत्र्यांना सादर करणार यादी

लोटेत ९४ कंपन्या प्रदूषणकारी
रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी ९४ कंपन्यांची यादी जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या आरोग्य समितीच्या सभेत सादर करण्यात आली़ मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करी असल्याने ही यादी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांकडे सादर करुन कारवाई करण्याची मागणी करण्याचा निर्णय आजच्या आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आला़
ही सभा सभापती डॉ़ अनिल शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत जिल्ह्यात सुरु असलेल्या रासायनिक कंपन्यांसंदर्भात जोरदार चर्चा झाली़ लोेटे येथे कंपन्यांकडून सुरु असलेल्या प्रदूषणावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही़ त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबद्दल सभेत सभापतींसह सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेला नेहमीच अनुपस्थित राहतात़ आजच्या सभेलाही आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित नव्हते़ या मंडळाने ९४ प्रदूषणकारी कंपन्यांची यादी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य समितीच्या सभेत सादर करण्यात आली़ प्रदूषण मंडळाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल सभापतींसह सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला़ यावेळी प्रदूषण मंडळाने प्रदूषणकारी कंपन्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला़ कंपन्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली, याबाबत आरोग्य विभागाने संपर्क साधून त्याची पाहणी करण्याच्या सूचना यासभेत देण्यात आली़ त्याचबरोबर प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईचा ठराव मंजूर करुन तो पर्यावरणमंत्र्यांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला़
आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती व कुपोषित बालकांवर या सभेत चर्चा करण्यात आली़ या सभेला समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)
लोेटे येथील प्रदुषणावर कोणाचे नियंत्रण नसल्याचा आरोप.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबद्दल सभेत तीव्र नाराजी.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेला नेहमीच अनुपस्थित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित.