नौका दुर्घटनेत लाखोंची हानी
By Admin | Updated: November 5, 2014 23:39 IST2014-11-05T23:00:59+5:302014-11-05T23:39:22+5:30
वेंगुर्लेतील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

नौका दुर्घटनेत लाखोंची हानी
वेंगुर्ले : वेंगुर्ले बंदरात तारली व बांगडा पकडण्यासाठी गेलेली उभादांडा नवाबाग येथील विजय अनंत केळुसकर यांची मच्छिमार नौका अतिभारामुळे वेंगुर्ले किनारपट्टीपासून आठ वाव खोल पाण्यात उलटली. मात्र, फायबर बोटीतील १० खलाशांना वाचविण्यात यश आले. यात बोटीच्या दोन इंजिनासह सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी सायंकाळी मालवण येथील स्कुबा डायव्हर्सच्या सहकार्याने स्थानिक मच्छिमारांनी ही बोट किनाऱ्यावर आणण्यात यश
मिळविले.
वेंगुर्ले बंदरात मोठ्या प्रमाणात थव्याने आलेली तारली व बांगडा ही मासळी पकडण्यासाठी नवाबाग येथील विजय अनंत केळूसकर यांची पात दहा खलाशांसह मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता समुद्रात गेली होती.
वेंगुर्ले लाईट हाऊससमोरील खोल समुद्रात मासळीने भरलेली पात अतिरिक्त भारामुळे कलंडली. परंतु त्या आधी खलाशांनी पुढील धोका लक्षात घेऊन दूरध्वनीवरून तशा सूचना दिल्या. त्यानुसार मालवण येथील जॉन नऱ्होना यांची ‘जुदित’ आणि वेंगुर्ले येथील ‘गणपती कृपा’ या ट्रॉलर्सनी घटनास्थळी धाव घेत खलाशांचे प्राण वाचविले.
बचाव कार्यात संदेश रेडकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा कुबल, जानू चोडणकर, छोटू आडकर, आतू फर्नांडिस, सागर गावडे, दादा केळूसकर, यशवंत तांडेल, नीलेश खडपकर, तुकाराम टांककर, मोेजेस फर्नांडिस यांच्यासह कस्टम कर्मचाऱ्यांनी सहकार्य
केले. (प्रतिनिधी)
पथकाचे प्रयत्न
दरम्यान, बुधवारी सकाळपासून बुडालेली बोट व जाळी किनाऱ्यावर आणण्यासाठी स्थानिक मच्छिमार व स्कूबा डायव्हर्सच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोट किनाऱ्यावर आणण्यात या पथकाला यश आले. मात्र, या दुर्घटनेत बोट, दोन इंजिन तसेच जाळी यांचे मिळून सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.