निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By Admin | Updated: December 4, 2014 00:54 IST2014-12-04T00:54:15+5:302014-12-04T00:54:15+5:30
कुडाळ तालुक्यातील स्थिती : प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही नाहीत

निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
कुडाळ : अवेळी पडणारा पाऊस व निसर्गातील बदललेल्या वातावरणामुळे यावर्षी कुडाळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीचे सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत.
त्यातच भात खरेदीचे दरही शासनाने कमी केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी केली आहे. याबाबत कुडाळ तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस, बदलते वातावरण यामुळे आंबा, काजू, बागायतदारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. कलम बागेतील झाडांना मोहोर येण्याच्या वेळेलाच वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. येथील शेतकरी व बागायतदार देशोधडीला लागण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही शासन स्तरातून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात नाही. कोकणातील शेतकरी, बागायतदार बदलत्या वातावरणाचा कसा सामना करतात, याबाबतची परिस्थिती सर्वज्ञात आहे. ही बाब शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणी बेळणेकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)