दहा लाखांचे नुकसान
By Admin | Updated: January 9, 2015 00:03 IST2015-01-08T21:43:23+5:302015-01-09T00:03:39+5:30
बागेला आग : बांदा देऊळवाडी येथील घटना

दहा लाखांचे नुकसान
बांदा : बांदा शहरातील देऊळवाडी भरडावरील काजू कलम बागेला गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत कित्येक एकर क्षेत्रातील सुमारे शेकडो काजू कलमे जळून खाक झालीत. स्थानिकांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.बागेला गुरुवारी भर दुपारी आग लागली. या आगीत तुकाराम मोरजकर, राजा सावंत, नाना मोरजकर, राजन मोरजकर, श्री. गोसावी या शेतकऱ्यांच्या काजू कलम बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याठिकाणी वस्ती नसल्याने सुरुवातीला आग लागल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. भरडावर गवत व पालापाचोळा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. भर दुपारी आग लागल्याने आग अटोक्यात आणणे ग्रामस्थांना मुश्किल झाले. आगीने रौद्र रुप धारण केल्याने या आगीत शेकडो काजू कलमे होरपळली. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.
ग्रामपंचायत सदस्य राजा सावंत, तुकाराम मोरजकर, बाबू चव्हाण, सतीश चव्हाण, नीलेश मोरजकर, बाबी सावळ आदी परिसरातील ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करुन पाणी व मातीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.
तरीदेखील कित्येक एकर क्षेत्र जळून खाक झाले. यात तुकाराम मोरजकर यांची सुमारे १00 काजू कलमे, सागवान, आयन किनळ, नाना मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत यांची काजू कलमे, सागवान, फणस, जांभुळ झाडे जळुन खाक झाली. या आगीत शेतकऱ्यांचे सुमारे १0 लाख रुपयांचे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला नव्हता. (प्रतिनिधी)