निवडणुकीसाठी तत्पर रहा
By Admin | Updated: October 1, 2014 00:48 IST2014-10-01T00:44:05+5:302014-10-01T00:48:16+5:30
कमल श्रीवास्तव : जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन

निवडणुकीसाठी तत्पर रहा
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी ही काटेकोर आहे. आचारसंहिता अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्पर राहून एकजुटीने काम करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. कमल श्रीवास्तव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक डॉ. कमल श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सनिल रेडकर, निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी अरविंद मोटाघरे, स्वीपचे नोडल अधिकारी अशोक साबळे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी बी. बी. हेगडे आदी उपस्थित होते. डॉ. श्रीवास्तव म्हणाले, निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेली तयारी अतिशय चोख आहे. स्थानिक प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना येणाऱ्या अडचणी अथवा मार्गदर्शनासाठी सर्व निवडणूक निरीक्षक आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासन उपलब्ध मनुष्यबळाचा वापर व निवडणूक कामाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडेल अशी मला आशा आहे, असे मत डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. ई. रविंद्रन म्हणाले, निवडणुकांकरिता पुरेसा कर्मचारी वर्ग मतदारसंघनिहाय उपलब्ध आहे. झोन व सेक्टर अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाच्या पोस्ट २००६ मेकच्या मशिन्स वापरण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार मशिन्सची तपासणी करून राजकीय पक्षांनाही याबाबतीत सर्व माहिती देऊन काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही, स्वीप कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान यंत्राची ओळख, रॅली या उपक्रमांची ई. रविंद्रन यांनी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे निवडणूक निरीक्षक यांच्यापुढे सादर केली. (प्रतिनिधी)