उभादांडा केपादेवी शाळेला कुलूप
By Admin | Updated: August 21, 2014 00:30 IST2014-08-20T21:51:20+5:302014-08-21T00:30:32+5:30
ग्रामस्थ आक्रमक : शिक्षक हजर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

उभादांडा केपादेवी शाळेला कुलूप
वेंगुर्ले : कायमस्वरुपी शिक्षक देण्याचे गटविकास अधिकारी यांनी पत्र देऊनही शाळेत शिक्षक हजर न झाल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आज उभादांडा मूठ येथील केपादेवी शाळेला कुलूप ठोकले. तसेच उद्या, २१ पर्यंत शाळेत दोन पदवीधर शिक्षक कायमस्वरुपी हजर न झाल्यास शाळा केपादेवीची मुले पंचायत समितीत शाळा भरवतील, असा इशारा पालक, ग्रामस्थांनी दिला आहे.
मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी मागणी करून केवळ तात्पुरता शिक्षक उपलब्ध करून शिक्षण खात्याचे प्रत्येकवेळी वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. आतापर्यंत या शाळेत १३ तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक करून शिक्षण खात्याने एक वेगळाच विक्रम केला आहे.
पालकांनी वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण खात्याकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. पालक व्यवस्थापन समितीने दिलेल्या पत्रानुसार शिक्षण विस्तार अधिकारी गोडे यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या शेरेबुकात स्वत: नोंद केली असून, कायमस्वरुपी शिक्षक देण्याचे मान्य केले. तर गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी आपल्या सहीशिक्क्यानुसार उमेश पडूळ या शिक्षकाची नेमणूक केल्याचे पत्र शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पेडणेकर यांना १६ आॅगस्ट रोजी दिले आहे. मात्र, हा शिक्षक १९ आॅगस्टपर्यंत उपस्थित न राहिल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला टाळे ठोकले. तसेच कायमस्वरुपी शिक्षक नेमणूक न झाल्यास २१ आॅगस्टपासून पंचायत समितीत शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप नामदेव डिचोलकर यांनी
दिली. (प्रतिनिधी)