कार्यालयास टाळे ; गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 24, 2014 22:30 IST2014-07-24T22:17:05+5:302014-07-24T22:30:32+5:30
श्री देव रवळनाथ देवस्थान समिती अध्यक्ष महादेव सोमा परब, ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी यांच्याविरूद्ध

कार्यालयास टाळे ; गुन्हा दाखल
सिंधुदुर्गनगरी : कोतवालपद भरतीत स्थानिक उमेदवाराला डावलल्याच्या रागातून ओरोस तलाठी कार्यालयास टाळे ठोकल्याप्रकरणी श्री देव रवळनाथ देवस्थान समिती अध्यक्ष महादेव सोमा परब, ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी यांच्याविरूद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओरोस तलाठी कार्यालयातील रिक्त असलेल्या कोतवालपदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत स्थानिक उमेदवाराला डावलल्याच्या रागातून ग्रामस्थांनी श्री देव रवळनाथ देवस्थान समितीने ओरोस तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले होते. २१ जुलै रोजी ही घटना घडली होती.
ओरोस तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे तलाठी रवींद्र निपाणीकर १८ जुलै रोजी दुपारी २ वाजता कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर कार्यालयास कुलूप लावून गेले असता त्या कुलपावर श्री देव रवळनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव परब, ग्रामस्थ, देवस्थानच्या मानकऱ्यांनी दोन कुलपे लावली असल्याचे मंगेश सखाराम यादव यांनी तलाठी निपाणीकर यांना कळविले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव परब यांनी कोतवाल भरतीमध्ये नारायण राणे यांना नेमणूक न दिल्याने तलाठी कार्यालयाला कुलूप लावल्याचे यावेळी सांगितले. यावरून तलाठी रवींद्र निपाणीकर यांनी या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यानंतर ही तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली आहे.
यासंबंधी अधिक तपास ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत सावंत करीत
आहेत. (प्रतिनिधी)