स्थानिक कलाकारांना कौतुकाची आस

By Admin | Updated: December 29, 2014 00:06 IST2014-12-28T21:33:39+5:302014-12-29T00:06:00+5:30

सावंतवाडी : स्थानिक कलाकारांच्या कलाप्रदर्शनाला प्रतिसाद

Local performers appreciate the excitement | स्थानिक कलाकारांना कौतुकाची आस

स्थानिक कलाकारांना कौतुकाची आस

अजय लाड -सावंतवाडी सध्या महोत्सवाची धूम असून याचाच एक भाग म्हणून येथील कलादालनात प्रसिद्ध चित्रकार एस. बी. पोलाजी यांच्या शिष्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्या प्रदर्शनात सहभागी पाचही कलाकार सावंतवाडी तालुक्यातील असून त्यांच्या कलेच्या आविष्कारातून साकारलेल्या प्रतिमांना कोकणचा वेगळाच बाज दिसून येत आहे. या प्रदर्शनातून सिंधुदुर्गातील कलेला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे.
सिंधुदुर्गातील कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी हल्ली विविध कार्यक्रमातून त्यांना वाव मिळावा, अशी मागणी होत आहे. यामुळे महोत्सवावेळी सावंतवाडीतील पाच कलाकारांच्या चित्रप्रदर्शनाचा आगळा कार्यक्रम मांडण्यात आला. सावंतवाडीतील जिमखाना मैदानावरील सावंतवाडी नगरपरिषदेचे कलादालन हे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांवेळीच खुले होते. मात्र, आता या कलादालनाची कवाडे स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील कलाकारांसाठी खुले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचीच सुरुवात म्हणून वाफोली येथील श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने जागतिक कीर्तीचे चित्रकार एस. बी. पोलाजी यांच्याकडे शिक्षण घेणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या कलेची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे.
कलाकारांनी या कलाप्रदर्शनात लावलेली चित्रे रसिकांना आकर्षित करणारी आहेत. स्थानिक कलाकारांनी काढलेली चित्रे म्हणून यांना कदाचित येथे कमी प्रतिसाद मिळतोय परंतु, येथील दर्दी रसिक कलावंत व कला क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या कलाप्रदर्शनाचा आस्वाद घेत आहेत.
या चित्रप्रदर्शनातून कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतीतील रंगांच्या छटा जीवनाच्या जगण्याला महत्त्व प्राप्त करुन देणाऱ्या आहेत. यातील रंग कलाकारांच्या कलाकृतीला घडविण्याचे तसेच त्यातून व्यक्त होण्यास शिकवतात याचेच दर्शन या प्रदर्शनातून होत आहे. स्थानिक कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याकरिता अथक प्रयत्न लागतात आणि त्या अथक प्रयत्नासाठी खऱ्या रसिकाच्या कौतुकाची थाप मिळावी लागते. आणखी काही नको, त्यामुळे सिंधुुदुर्गातील या कलाकारांना प्रोत्साहन करण्याचे काम आपणच केले पाहिजे.

प्रदर्शनात पुरस्कारप्राप्त चित्रांचा समावेश
या कला प्रदर्शनात मुंबई येथील अक्षय सावंत जो सध्या जे. जे. कला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्याने काढलेली कला प्रदर्शनातील पुरस्कारप्राप्त चित्रेही मांडण्यात आलेली आहेत. प्रदर्शनाला भेट देण्याऱ्यांमधूनही या चित्रांचे कौतुक होत आहे.

कला शिक्षणासाठी काहीही
या प्रदर्शनात सहभागी झालेला सावंतवाडीतील सिद्धेश सुर्वे हा विद्यार्थी पोलाजी यांच्याकडे शिक्षण घेत आहे. त्याने याआधी कोणत्याही कलेचे शिक्षण घेतलेले नाही. मात्र, त्याच्या कलेच्या आवडीमुळेच त्याने शालेय शिक्षण झाल्यानंतर नोकरी करण्याचे टाळत कलेचा मार्ग स्वीकारला आहे. आवड असणाऱ्या विषयात शिक्षण घेण्यासाठी त्याने केलेले हे प्रयत्न या प्रदर्शनामुळे सर्वांसमोर आले आहेत. त्याचे हे पहिलेच कलाप्रदर्शन असले तरीही त्याने चित्रकला शिकण्यासाठी केलेला त्याग हा कारणे दाखवणाऱ्या कलाकारांसाठी मार्गदर्शक आहे.

Web Title: Local performers appreciate the excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.