आर्थिक मागास महामंडळातर्फे कर्ज

By Admin | Updated: November 7, 2014 23:30 IST2014-11-07T22:11:22+5:302014-11-07T23:30:13+5:30

बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदाराला पाच लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा

Loan by the financial Backward Community Mahamandal | आर्थिक मागास महामंडळातर्फे कर्ज

आर्थिक मागास महामंडळातर्फे कर्ज

रत्नागिरी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदाराला पाच लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता बीज भांडवल कर्ज योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अर्थसहाय्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचा ६० टक्के सहभाग असून, अर्जदाराला ५ टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या ३५ टक्के रकमेवर ४ टक्के व्याज आकारण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा असून, कर्ज वितरीत केल्यानंतर त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाची वसुली सुरु केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ४५ असावे. अर्जदाराचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदविलेले असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी ५५ हजार रुपये व ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपयांच्या आत असावे. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी. त्याचे जिल्ह्यातील स्थायी वास्तव्य मागील तीन वर्षे असावे. अर्जदार कोणत्या संस्थेमार्फत विक्री करणार आहे, त्याचा तपशील देणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत बँकेचे ना देय प्रमाणपत्र, तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड व दोन वेगवेगळे जामीन देणे आवश्यक आहे. नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेप्रमाणे इतर कागदपत्र, करारपत्र, भाडेपावती, जागेबाबत पुरावा, तांत्रिक शिक्षणाचे प्रमाणपत्र, महानगरपालिका, ग्रामपंचायत परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट परवाना, डिलीव्हरी चलन आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Loan by the financial Backward Community Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.