देवगड तालुक्यामध्ये तुरळक पाऊस
By Admin | Updated: November 21, 2015 00:20 IST2015-11-20T22:51:43+5:302015-11-21T00:20:52+5:30
आंबा कलमांना धोका : मोहोरावर तुडतुडे पडण्याची शक्यता; उत्पादक चिंतेत

देवगड तालुक्यामध्ये तुरळक पाऊस
देवगड : तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अचानक तुरळक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे आंबा कलम मोहोरावर तुडतुडे पडण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.
यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस पडल्यामुळे याचा परिणाम भातशेतीसह कलम बागायतीवर झाल्याचे सांगण्यात येते. आंबा कलमांना खत घातल्यावर योग्य प्रमाणात पाऊस लागतो. मात्र, कमी पाऊस झाल्याने खत विरघळले नसल्याने त्याचा विपरीत परिणाम आंबा कलमांवर झाला आहे.
पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात होत असतानाच ढगाळ वातावरण व तुरळक प्रमाणात अचानक पाऊस पडल्याने याचा परिणाम आंबा पिकावर होऊ शकतो. सातत्याने पाऊस पडल्यास आंबा पीक धोक्यातही येऊ शकते.
तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुड्यांचे प्रमाण वाढत जाते.
यामुळे किटकनाशकांची फवारणी करावी लागते व औषधांचा खर्च वाढतो. अवकाळी पडलेल्या पावसामुळे बागायतदारांना असे दुष्परिणाम भोगावे लागतात. (प्रतिनिधी)