तिलारी धरणात मुबलक पाणीसाठा

By Admin | Updated: September 26, 2015 00:15 IST2015-09-25T23:46:44+5:302015-09-26T00:15:38+5:30

प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती : कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडले

Liquid water storage in Tilari Dam | तिलारी धरणात मुबलक पाणीसाठा

तिलारी धरणात मुबलक पाणीसाठा

कसई दोडामार्ग : चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने तिलारी मुख्य धरणात या वर्षी मुबलक पाणीसाठी होणार की नाही? अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र पावसाचे प्रमाण जरी क मी असले, तरी या धरणात आवश्यक पाणीसाठा झालेला आहे. १२.७० टिएमसी पाणीसाठा सद्यस्थितीत असून कोनाळ पुच्छ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत या धरणात स्थिर पाणीसाठा (१३.२० टिएमसी) होणार आहे, अशी तिलारी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा संयुक्त असा तिलारी प्रकल्प आहे. या तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून या धरणात मुबलक पाणीसाठा साठविला जात आहे. या धरणातील पाणी गोवा राज्याला तसेच तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांना पुरविला जात आहे. तर याच पाण्याचा वापर कोनाळ महालक्ष्मी केंद्राला केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या धरणात स्थीर पाणीसाठा साठवला जाऊन अतिरिक्त पाणी कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दरवाजे उघडे करुन तिलारी नदीत सोडले जाते. ३० जुलैपर्यंत ह्या धरणात पाणीसाठा होत असतो व ३१ जुलैला सर्व वक्रद्वारे बंद केली जात असून धरणातील अतिरिक्त पाणीसाठा ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडत असते. मात्र, यावर्षी निसर्गाच्या वातावरणात पूर्णत: बदल झाल्याने खुपच कमी प्रमाणात पाऊस कोसळला. तुरळक पडत असलेल्या पावसामुळे तिलारी धरणात पाणीसाठा होणार का? अशी एकप्रकारे या धरणातील पाण्यावर विसंबून असलेल्या गोवा व तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे धरण पाण्याने भरुन ओसंडून वाहत असे. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाने काही जोर धरला नाही. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने भितीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये पसरले होते.
मात्र, गेल्या १५ तारखेपासून चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने धरण भरण्याची चिंता मिटली. सध्या या धरणात १२.७० टिएमसी एवढा पाणीसाठा आहे. कोनाळ पुच्छ कालव्याने मुख्य गेटच्या चार दरवाजांपैकी पहिला व चौथा वक्रद्वार ५ सेमींनी उघडे करण्यात आले असून ४.३८ घ.सें.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही दरवाजांचे मिळून ८.७४ घ.से.मी. एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच या धरणाच्या पाण्याचा वापर महालक्ष्मी विज निर्मिती केंद्राला चोवीस तास वापरावयास सुरू आहे. ३१ आॅक्टोबर अखेर या धरणातील पाणीसाठा स्थिर होईल अशी माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)

सुटकेचा नि:श्वास
एकंदरीत यंदा धरण भरणार की नाही? मुबलक पाणी मिळणार की नाही? हे भेडसावनारे प्रश्न आता निकालात निघले असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही नेहमीच्या वेळेत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येईल, असे तिलारी प्रकल्पाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Web Title: Liquid water storage in Tilari Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.