औषधांच्या विक्रीसाठी जीवघेण्या कसरती
By Admin | Updated: November 14, 2014 00:14 IST2014-11-14T00:13:30+5:302014-11-14T00:14:09+5:30
पोटाच्या खळगीसाठी कायपण : ‘रियल हिरो’ने जिंकली वैभववाडीवासीयांची मने

औषधांच्या विक्रीसाठी जीवघेण्या कसरती
वैभववाडी : आयुर्वेदिक औषधाची विक्री आणि त्याची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी जीवघेण्या कसरतींचे चित्र सुन्न करणारे आहे. त्या औषधाच्या वापराने आजार बरे होतात हे सांगतानाच स्टंट वाटाव्या अशा करामती दाखवून पोटाच्या खळगीसाठी ‘कायपण’ करण्याची तयारी करणारे कुटुंब पहायला मिळाले. त्यांचे औषध काही प्रमाणात खपले मात्र कसरतींनी मिळविलेले ‘दान’ पोटाची लाचारी दाखवून गेले.
जेमतेम १० ते १५ मिलिच्या बाटलीतील ते औषध बहुगुणकारी असल्याचे सांगत कसरती करणाऱ्याने औषध दातांवर चोळून अनेकांना वाटाण्याच्या आकाराचे खडेही चावायला लावले. खडे दाताने फोडूनही वेदना होत नाही हीच खरी तर त्या औषधाची खरी सिद्धता होती. मात्र ती अधिक ठळकपणे पटविण्यासाठी त्याने अनेक जीवघेण्या कसरती केल्या. त्या खरोखरच सुन्न करणाऱ्या होत्या.
त्या औषधाच्या वापराने दात मजबूत होतात हे सिद्ध करण्यासाठी लोखंडी नांगर दातांमध्ये स्थिर धरून चालणे, लाकडी ओंडका दाताने उचलून डोक्यावरून मागे टाकणे, अंगाला औषध चोळून सुमारे १५० ते २०० किलोचा दगड छातीवरून फिरवणे या कसरतीनंतर मनगटाला औषध चोळून मनगटाने एकजीव दगड फोडूनही दाखविला. त्यामध्ये औषधाच्या वापराप्रमाणेच त्यांची विशिष्ट कलाही होती. मात्र, पोटासाठी लोक काय करतात याची प्रचितीही यावेळी आली.
औषध दिले जात होते १०० रुपयांना! मात्र जीवावर बेतणाऱ्या कसरती सादर केल्या त्या पोटाच्या खळगीसाठी कर्नाटक प्रांतातून आलेल्या त्या कुटुंबाला इकडच्या भाषेची जाण पुरेशी नसल्याने तीन-चार भाषांची ‘मिसळ’ करून ते विषयाची मांडणी करत होते. त्या अंगावर शहारे आणणाऱ्या कसरती पाहून काहींनी दहा, पाच रुपये दान दिले. मात्र रणरणत्या उन्हात त्यांच्या पोटाची आग शमविण्याएवढे नव्हते.
एकेकाळच्या ‘इडीएट बॉक्स’ (टीव्ही) वरील जाहिराती पाहून सौंदर्य प्रसाधने, वेदनाशामक औषधे खरेदी करण्याची अनेकांना सवय झाली आहे. मदिरेचा व्यासंग जडलेल्यांना स्वत:चीही खात्री नाही अशा काही मंडळींनी चक्क त्या आयुर्वेदिक औषधाची ‘एक्स्पायरी’ विचारणे काहीसे विनोदी वाटणारे आणि खिल्ली उडविणारे होते.
विविध उत्पादनांच्या नटनट्यांनी टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या काहीशा फसव्या जाहिराती प्रभावित करणाऱ्या ठरतात. मात्र, ‘रियल हिरो’च्या जीवघेण्या कसरतीनंतर एक्स्पायरी विचारणे आणि त्याला मिळालेली बक्षिसी विचार करायला लावणारी आहे. (प्रतिनिधी)