लाईफ जॅकेट बंधनकारक
By Admin | Updated: September 2, 2014 23:18 IST2014-09-02T23:12:48+5:302014-09-02T23:18:13+5:30
व्ही.एच.इंगळे : मालवणात सागरी पर्यटक व्यावसायिकांची बैठक

लाईफ जॅकेट बंधनकारक
मालवण : सिंधुदुर्गातील पर्यटन वाढत आहे. यामध्ये सागरी पर्यटनाचा मोठा वाटा आहे. पर्यटनाचा दर्जा सुधारण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेला महत्व आहे. स्कुबा, स्नॉर्कलिंग, वॉटरस्पोर्ट्स व किल्ला प्रवासी होडी व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बोटींवर लाईफ जॅकेट ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशा सूचना बंदर विभागाचे विभागीय अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे यांनी केल्या.
१ सप्टेंबरपासून पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. जिल्ह्यात अद्याप पावसाळी वातावरण असून समुद्र खवळलेला आहे. येथील पर्यटन व्यवसाय समुद्राशी निगडीत असल्याने पर्यटकांची सुरक्षितता आणि यांना महत्व राहणार आहे. याबाबत कोणत्याही त्रुटी राहू नये, तसेच पर्यटन व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी बंदर विभागाच्या कार्यालयात सागरी पर्यटन व्यावसायिकांची बैठक पार पडली.
यावेळी कॅप्टन इंगळे यांच्यासह पर्यटन विभागाचे सुबोध किनळेकर, किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, एमटीडीसीचे विलास मगदूम, दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, दादा आचरेकर, सचिन सावंत यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
प्रवासी किल्ला होडी व्यावसायिक संघटनेतर्फे मंगेश सावंत यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची होणारी चोरटी प्रवासी वाहतुकीकडे बंदर विभागाचे लक्ष वेधले. अशा वाहतुकीवर निर्बंध येणे आवश्यक आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता प्रवासी वाहतुकीच्या परवान्यांची मर्यादा ठरविणे आवश्यक आहे.
तसेच किल्ल्याजवळ मेरीटाईम बोर्डाकडून बांधण्यात आलेली प्रवासी जेटीमुळे ओहोटीच्यावेळी पर्यटकांना जेटीवर उतरण्यास त्रास होतो असेही सावंत यांनी कॅप्टन इंगळे यांच्या निदर्शनास आणले. स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, प्रवासी होडी वाहतूक आणि वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांमध्ये आपापसात समन्वय राखला जावा. तसेच स्नॉर्कलिंग, स्कुबा व किल्ला प्रवासी होडी वाहतुकीचा मार्ग स्वतंत्ररित्या ठरवून द्यावा अशी मागणी दामोदर तोडणकर यांनी केली. स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगकरीता परवाने देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. नियमावली तयार झाल्यानंतरच या संबंधिचे शासनस्तरावरून परवाने देण्यात येतील असे सुबोध किनळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)
पर्यटनात शिस्त, सुरक्षितता हवी : इंगळे
पर्यटकांना समुद्रात पर्यटनासाठी घेऊन जाणाऱ्या बोटींचे परवाने असले पाहिजेत. परवान्यांची मुदत संपली असल्यास त्याचे नूतनीकरण बोटधारकांनी वेळीच करून घ्यावे. ठरवून दिलेल्या प्रवासी संख्येइतकेच बोटीत प्रवासी असणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवासी पर्यटकाला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून प्रमाणित केलेले लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक आहे. पर्यटन व्यवसायासाठी वापरात असलेल्या बोटीवर बोटीचे नाव, क्रमांक ठळक अक्षरात असावे. सिंधुदुर्गातील पर्यटनाचा दर्जा उंचावायचा असेल, पर्यटन व्यवसायातून रोजगारात वाढ करायची असेल तर पर्यटनात शिस्त, सुरक्षितता आणि अधिकृतपणा असला पाहिजे असे कॅप्टन इंगळे म्हणाले.