ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी उसनवारीची
By Admin | Updated: October 27, 2014 23:24 IST2014-10-27T23:24:18+5:302014-10-27T23:24:18+5:30
दिवाळीनिमित्त बँकांना सुट्ट्या असल्याने नामुष्की ओढवली

ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी उसनवारीची
कुडाळ : सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणारा परीक्षण अनुदानाचा पहिला हप्ता ग्रंथालयांच्या बँकेच्या खात्यांवर जमा करण्यात आला आहे. मात्र, दिवाळीनिमित्त बँकांच्या सुट्ट्या असल्याने कर्मचाऱ्यांना यावेळीची दिवाळी ही उसनवारी घेऊनच साजरी करण्याची नामुष्की ओढावली आहे.
जिल्ह्यातील १३१ ग्रंथालयांची बिले वित्त विभागाचे पत्र जोडलेले नसल्याने कोषागार विभागातून अनुदान अदा करण्यास नकार देत सर्व बिले ओरोस येथील शासकीय ग्रंथालयात परत पाठविण्यात आली होती. प्रशासनाकडून झालेल्या अनागोंदी कारभारामुळे अनुदान वाटपात अनेक अडथळे सुरुवातीपासूनच येत होते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना तब्बल सात महिने मानधनाशिवाय राहवे लागले.
कर्मचारी संघटनांनीही प्रशासकीय पातळीवर या कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनुदान मिळण्यासाठी वित्त विभागाच्या पत्राचा अडथळा शासकीय ग्रंथालय अधिकाऱ्यांकडून कोणालाच कळविण्यात आला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर दिवाळीच्या आधी ग्रंथालयांच्या बँकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, दिवाळीनिमित्त बँकांना सलग पाच दिवस सुट्टी असल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मानधन हातात मिळालेच नाही. त्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना चतुर्थी व दिवाळी हे दोन्ही सण उसनवारीच्या पैशातच साजरे करावे लागले. (प्रतिनिधी)