राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करूया

By Admin | Updated: October 1, 2015 22:41 IST2015-10-01T22:41:27+5:302015-10-01T22:41:27+5:30

संदेश सावंत : कणकवली तालुका हागणदारीमुक्त घोषित

Let's try to come to the top in the state | राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करूया

राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करूया

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा येत्या दोन महिन्यात हागणदारीमुक्त करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा प्लास्टिकमुक्त करतानाच सर्वच क्षेत्रात प्रगती साधून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या सांघिक प्रयत्नांतून हे यश आपण निश्चितच मिळवू शकतो, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा परिषद व कणकवली पंचायत समिती यांच्यावतीने कणकवली तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यासाठी गुरुवारी येथील भगवती मंगल कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, समाजकल्याण समिती सभापती अंकुश जाधव, शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबासाहेब वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, विजय चव्हाण, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, तहसीलदार समीर घारे, माहिती उपसंचालक वर्षा शेडगे, जिल्हा माहिती अधिकारी सखाराम माने, सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश सावंत म्हणाले, कणकवली तालुका हागणदारीमुक्त होण्याचे श्रेय सर्वजण जरी मला देत असले तरी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सरपंच, इतर सदस्य व नागरिक यांचे ते श्रेय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अभिनंदनास ते पात्र आहेत. या यशानंतर आता आपली जबाबदारी वाढली आहे. असलेल्या त्रुटी उर्वरित काळात दूर करण्याबरोबरच तालुका कायमस्वरूपी हागणदारीमुक्त राहण्यासाठी सर्वांनी दक्ष रहायचे आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईची झळ बसू शकते. त्यासाठी आतापासूनच नियोजन करून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावे लागतील, असेही ते म्हणाले.
रणजित देसाई म्हणाले, कोकण हा सुसंस्कृत लोकांचा प्रदेश आहे. इतर भागांच्या तुलनेत तो स्वच्छ आहे. कुडाळ तालुका येत्या आठ दिवसांत हागणदारीमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर महिनाभरात संपूर्ण जिल्हाच हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
सतीश सावंत म्हणाले, कणकवली तालुका हा विकासात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. हा तालुका हागणदारीमुक्त झाल्याने जबाबदारीतून मुक्त झाल्याचे एका बाजूने वाटत असतानाच दुसऱ्या बाजूने जबाबदारी वाढली आहे. गावातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवकांचीही आहे. कणकवली तालुक्याला दिलेले एमआरजीएस अंतर्गत कामांचे उद्दिष्ट्यही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
शेखर सिंह म्हणाले, संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा आपल्याला मंत्र दिला. त्याचे आचरण करीत येत्या दोन महिन्यात जिल्हा हागणदारीमुक्त करायचा प्रयत्न आपण करूया. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनेही आपण वाटचाल करणे आवश्यक आहे. सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, सुनिल रेडकर, चंद्रसेन मकेश्वर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बाबासाहेब वर्देकर यांनी केले तर आभार आस्था सर्पे यांनी मानले. सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले तर आभार राजेश कदम यांनी मानले. (वार्ताहर)

दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महारॅली
हागणदारीमुक्त गाव झालेल्या ग्रामपंचायतींचा तसेच या अभियानात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी स्वच्छतेचा संदेश देणारी रॅली ढोलताशांच्या गजरात कणकवली शहरातून काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातून विविध चित्ररथ सहभागी झाले होते.
कणकवली तालुका लोकराज्य ग्राम झाल्याचे माहिती उपसंचालक वर्षा शेडगे यांनी या कार्यक्रमा दरम्यान बोलताना जाहिर केले.
सुरुवातीला प्रा. हरिभाऊ भिसे व विलास खानोलकर आणि सहकाऱ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत उपस्थितांचे कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

Web Title: Let's try to come to the top in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.