भातकापणीवर लेप्टो रोगाची टांगती तलवार

By Admin | Updated: October 21, 2016 23:30 IST2016-10-21T23:30:54+5:302016-10-21T23:30:54+5:30

जिवाणूंशी येतोय प्रत्यक्ष संबंध : शेतकऱ्यांमध्ये धास्ती

Leprosy sword | भातकापणीवर लेप्टो रोगाची टांगती तलवार

भातकापणीवर लेप्टो रोगाची टांगती तलवार

सुरेश बागवे कडावल
ग्रामीण भागात भातकापणीच्या कामास वेग आला आहे. परिणामी लेप्टो स्पायरोसिसच्या जिवाणूंचे वसतिस्थान असू शकणाऱ्या भात खाचरांशी आता शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला आहे. जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचे बळी घेतलेल्या या रोगाचे सावट अद्याप पूर्णत: दूर झालेले नाही. खरीप भात लावणी आणि भातकापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्व इतिहास असल्याने येथील शेतकऱ्यांना भातकापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.
जिल्ह्यातील जनतेला गेल्या काही वर्षांपासून लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कणकवली तालुक्यातील काही गावांपर्यंतच मर्यादित असलेल्या लेप्टोनंतर जिल्ह्याच्या इतर भागातही थैमान घालायला सुरुवात केली. या रोगामुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लेप्टोच्या प्रभावाखाली प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता अधिक प्रमाणात आल्याचे दिसून येते. विशेषत: भात लावणी व कापणीच्या काळातच या रोगाचा अधिक फैलाव झाल्याचा पूर्वइतिहास असून, आजपर्यंत या रोगामुळे गेलेल्या बळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. लेप्टो जिवाणूंचे उगमस्थान असलेल्या उंदीर, घुशींचा वावर जेथे अस्वच्छता व अडगळ असेल तेथे मोठ्या प्रमाणात असते. तेथे त्यांनी विसर्जित केलेल्या मूत्रातील जिवाणू आसपासच्या परिसरात तसेच भात खेचरात स्थिरावतात. केवळ दोन मिलीलिटर मूत्रात सुमारे दहा कोटी जिवाणूंचा अधिवास असू शकतो. यावरून याची भयानकता सहज लक्षात येते. पायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा व इक्टिरोहिमोरेडिका, आदी लेप्टोचे प्रमुख ज्ञात जिवाणू आहेत.
 

Web Title: Leprosy sword