देवतळेतील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

By Admin | Updated: November 11, 2014 23:21 IST2014-11-11T22:22:20+5:302014-11-11T23:21:49+5:30

विहिरीमध्ये लाकडी पिंजरा सोडून त्याला ग्रामस्थांच्या सहाय्याने वर काढण्यात आले.

The leopards died in the well in the well | देवतळेतील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

देवतळेतील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

रत्नागिरी : देवतळे परिसरातील पाली वळके शेडनजीक एका खोल विहिरीत पडल्याने बिबट्या मृत झाला आहे. त्याचे अंदाजे वय २ वर्षे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तो बिबट्या एखाद्या भक्ष्याच्या मागे लागलेला असताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेले काही दिवस या परिसरात त्याचे सातत्याने वास्तव्य आढळून येत होते.
त्या विहिरीवर हिरवी जाळी होती. त्याचा अंदाज न आल्याने मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नजीकच्या पाली देवतळे माळ येथील पाली - वळके रस्त्यानजीकचे कृषी सहाय्यक रघुनाथ डवरी यांच्या घरानजीकच्या विहिरीमध्ये उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता बिबट्या असल्याचे आढळून आल्याने तत्काळ वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी डवरी यांच्या विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता ३५ ते ४० फूट खोल पाण्यावर कुजलेल्या अवस्थेत बिबट्या तरंगताना आढळून आला. विहिरीमध्ये लाकडी पिंजरा सोडून त्याला ग्रामस्थांच्या सहाय्याने वर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली असता तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृत असल्याचे आढळून आल्याने त्याचा मृत्यू पाण्यात पडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा बिबट्या रात्रीच्या वेळी एखाद्या भक्ष्याच्या मागे असताना तोल जाऊन विहिरीत पडला असण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तो पाण्यात पडल्यावर वर येण्यासाठी त्याने विहिरीतील पाईप व फुटबॉलच्या दोरीचा आधार घेतला असावा. त्यामुळे तीही तुटून पडली होती. तसेच विहिरीच्या भिंतीवरही पायाचे ठसे आढळून आले. बिबट्या पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. परंतु या विहिरीपासून नागरी वस्ती पन्नास फुटावर असूनही इतक्या दिवसांनी ही घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या परिसरात दोन आठवड्यात बिबट्या आढळण्याची ही दुसरी घटना आहे.
बिबट्याला परिक्षेत्र वनाधिकारी स. म. गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल व्ही. वाय. गुरवळ, वनरक्षक उमेश आखाडे यांनी जाळून नष्ट केले. त्याला बाहेर काढण्यासाठी दिनेश चाळके, धनंजय चव्हाण, अमर कोलते, अजित साळवी, संतोष गराटे, बळवंत मोरे, अनंत सुवारे, राजू दळवी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The leopards died in the well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.