तब्बल १२0 सहकारी संस्था बंदावस्थेत

By Admin | Updated: October 2, 2015 23:23 IST2015-10-02T23:21:51+5:302015-10-02T23:23:51+5:30

धक्कादायक बाब तपासणीदरम्यान उघड : उपनिबंधकांनी ७९ संस्थांना बजावल्या नोटिसा

At least 120 co-operatives are in Bandhavasthastha | तब्बल १२0 सहकारी संस्था बंदावस्थेत

तब्बल १२0 सहकारी संस्था बंदावस्थेत

गिरीश परब ल्ल सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्तालयांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत १ हजार १५८ विविध सहकारी संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून बँकांचा व्यवहार, संचालक मंडळाच्या सभा, लेखा परीक्षण, निवडणुका याबाबतचे कामकाज ठप्प असणाऱ्या जिल्ह्यातील १२० सहकारी संस्था बंदावस्थेत असल्याची धक्कादायक बाब तपासणी दरम्यान उघड झाल्याने या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक विभागाने यातील ५३ सहकारी संस्था या अवसायानात काढल्या असून ७९ सहकारी संस्थांना नाटिसा पाठवून खुलासा मागितला आहे.
राज्यात काही संस्था या कागदोपत्री, ठावठिकाणा नसणाऱ्या व बंद अवस्थेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यातील २ लाख ३० हजार सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला होता. सक्षम असणाऱ्या संस्थाच चालू ठेवाव्यात व कागदोपत्री व ठावठिकाणा नसणाऱ्या ंंसंस्था बंद करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्ह्याच्या प्रत्येक उपनिबंधक अधिकाऱ्यांना दिले होते. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण करून तपासणीचा अहवाल सहकार खात्याकडे पाठविण्याचे आदेश दिल्यानंतर लागलीच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १ हजार १५८ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
जिल्हा उपनिबंधक अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील ३० कर्मचाऱ्यांना या सहकारी संस्था सर्वेक्षणाच्या मोहिमेमध्ये सामिल करून घेण्यात आले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हे कर्मचारी संस्थांचे सर्वेक्षण करताना संस्थेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संस्था अध्यक्ष, कार्यक्षेत्र, संस्था ही त्याच पत्त्यावर आहे का? संस्थेचा वर्ग, नफा-तोटा, वार्षिक सर्वसाधारण सभेची दिनांक, बँक खात्यावर शेवटच्या झालेल्या व्यवहाराची तारीख, लेखा परीक्षणाची तारीख, कामकाज सुरु आहे का? आदी माहिती या संस्थांना भेटी देऊन गोळा करण्यात आली होती. सहकारी संस्थांची तपासणी करताना बँकेचा व्यवहार पूर्ण नसणे, संचालक मंडळाच्या सभा वेळेवर न घेणे तसेच संस्थांचे लेखा परीक्षण न करणाऱ्या व कागदोपत्री असणाऱ्या १२० सहकारी संस्था या दोषी आढळल्या असून त्या बंदावस्थेत असल्याचा अहवाल आयुक्त विभाग (मंत्रालय) येथे पाठविण्यात आला आहे. या १२० संस्थांमध्ये ३० संस्था या सर्वसाधारण पर्यटन बेरोजगार, पाणी वापर व खारभूमीच्या २५ संस्था, ३ मजूर सहकारी संस्था, १५ हाऊसिंग सोसायटी, प्रक्रिया संस्था व औद्योगिकीकरणाच्या २८ संस्था, १९ पतसंस्था यांचा समावेश आहे.
दोन संस्थांचा ठावठिकाणाच नाही
संस्था नोंदणी करताना एका पत्त्यावर नोंदणी केली मात्र सर्वेक्षण अधिकारी त्या पत्त्यावर जावून पोहोचताच तर त्या जाग्यावर संस्था नाही, अशा एकूण जिल्ह्यातील दोन संस्था या जाग्यावरच नसल्याचे उघड झाले आहे.
यापैकी एक संस्था ही कोल्हापूर तर एक संस्था गडहिंग्लजला स्थापन झाल्याचेही समोर आले.
अहवाल उपनिबंधक विभागाने सहकार आयुक्तांना पाठविला आहे. यावरील संस्थांना कार्यक्षम होण्यासाठी योग्य वेळ देण्यात आला असून त्यांची प्रगती न सुधारल्यास एक एक संस्था नोंदणी रद्द करण्याची कारवाई जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
५३ सहकारी संस्था अवसायनात
जिल्ह्यातील ५३ सहकारी संस्थांचे प्रत्यक्षात काम सुरु नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्या अवसायनात काढल्याची कारवाई उपनिबंधक विभागाने केली आहे. जिल्ह्यातील ५३ संस्थांना अंतरिम नोटीस बजावून खुलासा मागविला होता.
मात्र त्याचा खुलासा अमान्य असल्याने उपनिबंधक विभागाने त्या संस्था अवसायनात काढल्या आहेत तर आता ७९ सहकार संस्थांना अंतरीम नोटीस बजावून कामकाजाबाबत विचारणा केली आहे. या संस्थांना सहकारी संस्थांचे कलम १०२ अंतर्गत नोटिसा बजावून १५ दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खुलासा अमान्य असल्यास या संस्थाही अवसायनात काढल्या जाणार आहेत. अशी माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत सहकारी संस्थांचे जाळे फार कमी आहे. असे असताना असलेल्या सहकारी संस्थांना उभारी देणे आवश्यक बनले आहे.
१0९९ संस्थांचे काम समाधानाचे
जिल्ह्याभरातील ११५७ सहकारी संस्थांपैकी १०९९ सहकारी संस्थांचे कामकाज हे समाधानकारक आढळले आहे. बँकेच्या व्यवहाराच्या नोंदी, संचालक मंडळाच्या सभा, निवडणुका, आॅडिट आदी कामकाज वेळच्यावेळी होत असल्याची माहिती सर्वेक्षणादरम्यान समोर आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: At least 120 co-operatives are in Bandhavasthastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.