समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करणे गरजेचे : भालचंद्र मुणगेकर

By Admin | Updated: August 24, 2014 22:33 IST2014-08-24T22:08:50+5:302014-08-24T22:33:53+5:30

कणकवलीतील ‘कास्ट्राईब’ महासंघाच्या मेळाव्यात प्रतिपादन

Leaders who lead the community need to create: Bhalchandra Mungekar | समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करणे गरजेचे : भालचंद्र मुणगेकर

समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करणे गरजेचे : भालचंद्र मुणगेकर

कणकवली : देशात भ्रष्टाचार फोफावला आहे. त्याचे परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. आपल्या राष्ट्राबद्दलचे प्रेम हे जाती व धर्मावर ठरविले जाते हे अत्यंत चुकीचे आहे. यापुढील काळात समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचा जिल्हा मेळावा येथील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मुणगेकर बोलत होते. कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, कास्ट्राईब संघटनेचे राज्य महासचिव एस. टी. गायकवाड, गुंडू चव्हाण, डी. एम. चाटे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम, भालचंद्र गोसावी, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, उदय सर्पे, नरेश कारिवडेकर, वसुंधरा चव्हाण, अच्युत वणवे, प्रदीप मांजरेकर, प्रदीप सर्पे, शिवाजी पवार, महेश गुरव, आर. बी. चव्हाण, संचिता कुडाळकर आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. मुणगेकर म्हणाले, समाजाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची देशाला खरी गरज आहे. ही गरज पुरी करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. जीवनात कोणतीही गोष्ट मागून मिळत नाही तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कास्ट्राईब संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून समाजातील सर्व घटकांसाठी काम केले पाहिजे. देशातील आर्थिक व सामाजिक बदलांमध्ये गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.
संदेश पारकर म्हणाले, शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कास्ट्राईब संघटना काम करीत आहे. या संघटनेने समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. महाराष्ट्र कामगार बोर्डाकडे या संघटनेने कामगारांची नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
एस. टी. गायकवाड म्हणाले, कास्ट्राईब संघटनेचा मी एक पाईक आहे. संघटनेच्यावतीने विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाकडे पाठपुरावा करून दूर केले आहेत. कोणतेही वाईट काम करीत असताना अडथळे येत नाहीत. पण चांगले काम करताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे संघटीतपणे आपण आपले प्रश्न सोडविले पाहिजेत.
आर. बी. चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेच्यावतीने दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच समाजासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Leaders who lead the community need to create: Bhalchandra Mungekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.