जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्षांच्या गाडीवर लाथा
By Admin | Updated: April 22, 2015 00:23 IST2015-04-21T23:39:08+5:302015-04-22T00:23:51+5:30
भर रस्त्यातील प्रकार : स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी काढला राग; गाडी अडवून चप्पलाने मारण्याचाही प्रयत्न

जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्षांच्या गाडीवर लाथा
कणकवली : महामार्गावर गाडी आडवी लावत जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्षांची गाडी अडवून स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गाडीवर लाथा घातल्या. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता येथील प्रांत कार्यालयासमोर घडलेल्या या प्रकाराने सारेच अचंबित झाले.
प्रांत कार्यालयासमोर सायंकाळी अचानक एक इनोव्हा गाडी तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या नव्या कोऱ्या मरून रंगाच्या कारसमोर आडवी घातली. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ही नवी कोरी गाडी स्वत: चालवत होत्या. झटक्यात इनोव्हा गाडीतून जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या आणि त्यांचे पती उतरले आणि धावून जात गाडीवर लाथा घालण्यास सुरूवात केली. माजी अध्यक्षा खाली न उतरता कारमध्येच बसून होत्या. महिला सदस्यांनी कारच्या काचेवर हात आपटले. त्यांच्या पतीने ‘आ’ की ‘बा’ न पाहता मारलेल्या लाथांनी नव्या कारची बॉडीही चेपली. या झटापटीत महिला सदस्यांनी माजी अध्यक्षांना चप्पलाने मारण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये पडलेले चप्पल काही अंतरावर माजी अध्यक्षांनी कारबाहेर टाकले आणि त्या मार्गस्थ झाल्या. भर रस्त्यात घडलेल्या मिनिटभराच्या या प्रकाराने पाहणारेही अवाक झाले. ‘बंगल्या’वर या नाट्याचा पूर्वरंग आधीच पूर्ण झाला होता, असे समजते. यात माजी अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या यांच्यात दुपारी ‘बंगल्या’वर आधीच बाचाबाची होऊन तेथे एकमेकींच्या झिंज्या उपटण्यात आल्या होत्या. मात्र, वरिष्ठ पातळीवर समज देऊन तात्पुरता पडदा टाकला होता. मात्र, धुमसत असलेल्या रागाचे पडसाद शेवटी रस्त्यावर अशारितीने उमटले.
तिन्ही पदाधिकारी कुडाळ तालुक्यातील असल्याने कुडाळसह या प्रकाराची चर्चा वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली. सार्वजनिक ठिकाणी जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबद्दल वरिष्ठ आता कोणता निर्णय घेणार? याबद्दल चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)