ट्रामा केअरचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: September 4, 2014 00:06 IST2014-09-03T22:57:00+5:302014-09-04T00:06:01+5:30
सावंतवाडीत सुविधा : लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी

ट्रामा केअरचे काम अंतिम टप्प्यात
प्रसन्न राणे - सावंतवाडी -येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या ट्रामा केअरचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. लवकरात लवकर या ट्रामा केअरअंतर्गत शस्त्रक्रिया विभाग सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा. तसेच येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दिवसरात्र सेवा देणारे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. उत्तम पाटील यांच्यासारखे वैद्यकीय अधिकारी या ट्रामा केअर सेवेस मिळाल्यास रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मत व्यक्त होत आहे. या ट्रामा केअरचे काम मंद गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत ट्रामा केअरच्या कन्स्ट्रक्शनचे काम पूर्ण झाले आहे. रुग्णांसाठी आवश्यक बेड, शस्त्रक्रिया विभाग, लॅब आदी सामुग्रीची आता आवश्यकता असून लवकरात लवकर या सर्व मशिनरीज ट्रामा केअर सेंटरमध्ये उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करून लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा के अर सेंटरचा लाभ सावंतवाडीवासीयांसह जिल्हाभरातील रुग्णांनाही मिळणार आहे. गेल्या वर्षभरात झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावर अनेक ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तर काहीजण जायबंदी झाले. अशा अपघातातील जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेची तत्काळ सेवा देण्यात आली. या अॅम्ब्युलन्समध्ये असणारे डॉ. पियुष येझरे, डॉ. बी. आर. कुंभार यांनी वेळीअवेळी, अहोरात्र अपघातग्रस्त रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयापर्यंत आरोग्य सेवा देण्याकरिता आणले. परंतु रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने या जखमींना गोवा- बांबोळी येथे हलवावे लागते. या प्रवासात गंभीर जखमी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ट्रामा केअरद्वारे या रुग्णांवर उपचार झाल्यास अशा रुग्णांना जीवदान मिळणार आहे.
गंभीर जखमींना जीवदान मिळणार
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक शस्त्रक्रिया उपलब्ध नसल्याने रूग्णांना गोवा-बांबोळी येथे हलवित असतानाच यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला. ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण झाल्यास अपघातातील गंभीर जखमींना जीवदान मिळू शकते. यासाठी ट्रामा केअरचे काम शक्य तेवढ्या जलद गतीने पूर्ण करून रुग्णांच्या सेवेस उपलब्ध करणे आवश्यक आहे.